लेटलतिफांना बसणार चाप; वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची क्यूआर कोडप्रणालीद्वारे हजेरी
By विजय मुंडे | Published: September 30, 2022 07:22 PM2022-09-30T19:22:46+5:302022-09-30T19:23:49+5:30
राज्यातील पहिला प्रयोग, वेतनाचा प्रश्नही लागणार मार्गी
- विजय मुंडे
जालना : आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी आता क्यूआर कोडप्रणालीद्वारे घेतली जाणार आहे. सीईओ मनूज जिंदल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत राज्यात प्रथमच हा प्रयोग राबविण्यात आला असून, यामुळे लेटतलिफांना चाप बसणार आहे. शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विलंबाने होणारे वेतन वेळेवर होण्यास मदत होणार आहे.
क्यूआर कोडप्रणालीद्वारे दैनंदिन हजेरी उपक्रमास शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी सीईओ जिंदल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. म्हस्के, डॉ. जयश्री भुसारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उशिराने येत असल्याच्या अनेक तक्रारी सीईओ जिंदल यांच्याकडे आल्या होत्या. शिवाय यापूर्वी राबविण्यात येत असलेल्या दैनंदिन हजेरी उपक्रमात तांत्रिक दोष असल्याची ओरडही होती. ही बाब पाहता क्यूआर कोडप्रणालीद्वारे दैनंदिन हजेरी घेण्याची संकल्पना सीईओ जिंदल यांनी मांडली. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध संस्थांशी चर्चा करीत ही प्रणाली शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी कार्यान्वित केली.
या प्रणालीद्वारे जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २१८ उपकेंद्रे, ८ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये, युनानी, आयुर्वेदिकच्या ८ संस्था अशा जवळपास २७० हून अधिक संस्था जोडल्या जाणार आहेत.
जिंदल यांचे दोन उपक्रम राज्यभरात
यापूर्वी सीईओ मनूज जिंदल यांनी कोरोनाकाळात जिल्ह्यात राबविलेला ‘मिशन कवच कुंडल’ हा लसीकरणाचा उपक्रम राज्यभरात राबविण्यात आला. शिक्षकांचे वेतन वेळेत व्हावे यासाठी राबविण्यात येणारा ‘पीएफएमएस’प्रणाली हा उपक्रमही अनेक जिल्हा परिषदांमध्ये लागू झाला आहे. आता क्यूआर कोडद्वारे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी उपक्रमही राज्यासाठी पथदर्शी ठरणारा आहे.
शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी वेळेत कार्यालयात यावेत, त्यांच्या हजेरीचा प्रश्न मार्गी लागावा, त्यांचे वेतन वेळेत व्हावे यासाठी क्यूआर कोडप्रणालीद्वारे दैनंदिन हजेरीचा उपक्रम प्रथमत: आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात आला आहे. याचा नक्कीच प्रशासकीय कामकाजात लाभ होईल.
- मनूज जिंदल, सीईओ, जि.प., जालना