'...कायदा सुवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत'; बदलापूर घटनेवरून जरांगेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 07:06 PM2024-08-20T19:06:35+5:302024-08-20T19:08:36+5:30
सरकारचं लक्ष जनतेच्या समस्यांवर आहे की सत्तेच्या जुगाडावर, हेच ठरवायचं आहे: मनोज जरांगे
वडीगोद्री( जालना ) : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बदलापूर येथील दुर्दैवी घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, सरकारचं लक्ष गोरगरीब जनतेवर नसून फक्त आणि फक्त सत्तेवर केंद्रित आहे. "त्या छोट्या लेकरांना काही कळत नाही अन् कायदा सुव्यवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत," अशी खरमरीत टीका जरांगे पाटील यांनी केली.
पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करून नेत्यांच्या पुरोगामी भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "सरकारचं लक्ष जनतेच्या समस्यांवर आहे की सत्तेच्या जुगाडावर, हेच ठरवायचं आहे," असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच मराठा, दलित आणि मुस्लिम समाजांच्या एकत्र येण्याचा उल्लेख करत जरांगे यांनी इशारा दिला की, सरकारला या समाजांवर होणाऱ्या अन्यायाची किंमत चुकवावी लागेल. "पाच वर्षांत काहीच न करणारे, आता निवडणुकीच्या तोंडावर वचनं देतात," असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. आमचे घोंगडी खाली हात गुंतलेले आहेत, असं त्यांच्यातले लोक आम्हाला सांगताय, कोणाला ही फडणवीस आरोप करायला लावताय. संघर्ष आणि लढाई वेगळा भाग आहे आणि आरक्षण वेगळा भाग आहे. माणसाचे मन जिंकावे लागतात तेव्हा सत्ता येते. आमच्या गोरगरिबांच्या हातात सत्ता आली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांना कधीच गुंतवणार नाही. तुम्ही राजीनामा देऊ नका, गोरगरिबांचे प्रश्न सोडवा, असे आवाहन जरांगे यांनी केले.
दरम्यान, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे बंधू अशोक मुंढे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, ज्यामध्ये २० मिनिटे चर्चा झाली. अशोक मुंढे हे गेवराई मतदार संघातून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे, परंतु त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला आहे.