स्थानिक गुन्हेचे ‘सर्जिकल स्ट्राईक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:02 AM2019-06-26T01:02:11+5:302019-06-26T01:02:18+5:30

अवैध वाळू उपशासाठी प्रसिध्द असलेल्या गोदाकाठावर मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत वाळू साठे जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली.

LCB"s 'Surgical Strike' | स्थानिक गुन्हेचे ‘सर्जिकल स्ट्राईक’

स्थानिक गुन्हेचे ‘सर्जिकल स्ट्राईक’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अवैध वाळू उपशासाठी प्रसिध्द असलेल्या गोदाकाठावर मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत वाळू साठे जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व त्यांच्या पथकाने सकाळीच गोदाकाठ गाठून ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला. यामुळे चक्क दोन किलोमीटर परिसरात दडवून ठेवलेले साठे शोधून काढण्यास मोठी मदत झाली. ही कारवाई करत असतानाच शेजारील गावात सुरू असलेल्या वाळू उपशावर कारवाई करून जेसीबी, हायवा आणि पोकलेन जप्त केले.
गेल्या काही वर्षापासून गोदावरी नदीपात्रासह जिल्ह्यातील अन्य नद्यांमधून वाळूचा अवैध उपसा होत होता. शेवटी हे प्रकरण नेहमीप्रमाणे पावसाळी अधिवेशनात आ. विनायक मेटे यांनी उपस्थित केले होते. त्यानंतर महसूल आणि पोलीस प्रशासन चांगलेच कामाला लागले. दोन दिवसांपासून पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केळीगव्हाणसह अन्य गावात जाऊन वाळूसाठे जप्त केले होते. तर महसूल विभागानेही चारही उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक नेमून जाहीर लिलाव झालेल्या वाळू घाटातून किती जास्त उपसा झाला, याची मोजदाद केली. त्याचा अहवाल अद्याप यायचा आहे.
दरम्यान कुरण, मंगळूरसह अन्य गोदवारी पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचे साठे असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गौर यांना कळाली. त्यांनी लगेचच ही माहिती पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार औरंगाबाद येथून खास ड्रोन कॅमेरा मागवून इन कॅमेरा अवैध वाळू साठे जप्त केले. यावेळी अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने यांनाही पंचनामे करण्यासाठी तसेच अवैध वाळूचा साठा कसा दडविला आहे, याची माहिती देऊन संयुक्त मोजणी केली.
ही मोजणी केली असता, जवळपास एक हजार ६५० ब्रास साठा केलेली वाळू आढळून आली.
ही कारवाई सुरू असतानाच शेजारील गोदावरी पात्रात मंगरूळ येथील श्रीराम मठा जवळ पोकलेनने वाळूचा अवैध उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली. लगेचच गौर व तहसीलदार मेने यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथेही मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा साठा जप्त केला. एकूणच कुरण, पाथरवाला, मंगरूळ अशा तिन्ही ठिकाणी मिळून एक कोटी ८९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे गौर यांनी सांगितले. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.
कुरण : पोलीस अधीक्षक आॅन दी स्पॉट
सकाळपासून सुरू असलेल्या या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईला सायंकाळी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी तातडीने भेट देऊन अवैध वाळू साठ्यांची तहसीलदार मनीषा मेने यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी अंबडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सी.डी. शेवगण हे देखील उपस्थित होते. या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईचे पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी स्वागत केले.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, सावळे, सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ भिसे, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, फूलचंद हजारे, संजय मगरे, प्रशांत देशमुख, रामेश्वर वघाटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, हिरामण फलटणकर, सचिन चौधरी, सोमनाथ उबाळे, राहुल काकरवाल, विलास चेके, किशोर जाधव, गणेश वाघ, धम्मपाल सुरडकर, सूरज काटे, महिला कर्मचारी मंदा बनसोडे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: LCB"s 'Surgical Strike'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.