स्वच्छतेशी नेत्यांना काय देणेघेणे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:03 AM2018-01-14T00:03:23+5:302018-01-14T00:04:08+5:30

शनिवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस सर्व दिग्गज नेतेमंडळींना आमंत्रित करण्यात आले. मात्र, पालिका प्रशासनाने योग्य समन्वय न साधल्याने नेतेमंडळींनी कार्यशाळेकडे पाठ फिरवली

Leaders what to do with cleanliness? | स्वच्छतेशी नेत्यांना काय देणेघेणे?

स्वच्छतेशी नेत्यांना काय देणेघेणे?

googlenewsNext

जालना : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी नगरपालिका प्रशासनातर्फे वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस सर्व दिग्गज नेतेमंडळींना आमंत्रित करण्यात आले. मात्र, पालिका प्रशासनाने योग्य समन्वय न साधल्याने नेतेमंडळींनी कार्यशाळेकडे पाठ फिरवली. चार नगरसेवक वगळता इतर नगरसेवकांनी या कार्यशाळेला दांडी मारल्याचे दिसून आले.
नगरपालिका व सृष्टी फाऊंडेशनतर्फे सौर उर्जेतून घनकच-याचे विघटन आणि व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत प्रात्यक्षिक दाखविण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे. जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम पत्रिकेत संयोजक म्हणून दोन वेगवेगळ्या ठिकाणी नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांची नावे टाकण्यात आली. सकाळी साडेअकराच्या सुमारास फुलंब्रीकर नाट्यगृहात कार्यशाळेला सुरुवात झाली. मात्र, आमंत्रितांपैकी कुणीच हजर नव्हते. त्यामुळे उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली. या विषयी पालिकेतील एका जबाबदार अधिकाºयाने सांगितले, की कार्यशाळेच्या निमंत्रण पत्रिकेत उपस्थितांची नावे टाकताना संबंधितांशी कुठलाच संपर्क करण्यात आला नाही. पालिकेच्या पदाधिका-यांसह अधिका-यांनी याबाबत नेते मंडळींशी चर्चा के ली नाही. केवळ नावे टाकून शिपायाच्या हस्ते उपस्थित राहण्याबाबत पत्रिका पाठविण्यात आल्या. योग्य समन्वयाअभावी हा प्रकार घडला असावा. विशेष म्हणजे नगरपालिकेची कार्यशाळा असल्यामुळे किमान सभापतींसह सत्ताधारी नगरसेवक कार्यशाळेस हजर राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, चार नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांनी या दांडी मारली. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी पालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे केवळ दाखविण्यासाठी कार्यक्रम न घेता, त्याची योग्य अंमलबजावणी व्हायला हवी, असा सूर ऐकायला मिळाला.
-------------
स्वच्छता अभियानास सहकार्याचे आवाहन
कार्यशाळेत सौर उर्जेतून घनकच-याचे विघटन कसे करावे, याबाबत पर्यावरण व जीवशास्त्राचे अभ्यासक प्रा. चंद्रकांत गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले. घनकचरा विघटनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. एमआरडीए स्कूलच्या विद्यार्थ्यांची परिसर स्वच्छतेसंबंधी सादर केलेल्या नाटिकेने उपस्थितांचे लक्ष वेधले. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. कार्यशाळेसाठी सृष्टी फाऊंडेशनच्या प्रतिभा श्रीपत, आकाश गायकवाड यांच्यासह पालिकेच्या अधिका-यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Leaders what to do with cleanliness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.