'शिक बाबा शिक लढायला शिक'; माझ्या कविता विरोधी पक्षाला आवडतात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:49 PM2020-02-03T18:49:55+5:302020-02-03T18:51:26+5:30

कविता म्हणत म्हणत सदाभाऊ खोत मंत्री झाले - इंद्रजित भालेराव 

'...learn to fight'; My poems love the opposition : Indrajeet Bhalerao | 'शिक बाबा शिक लढायला शिक'; माझ्या कविता विरोधी पक्षाला आवडतात 

'शिक बाबा शिक लढायला शिक'; माझ्या कविता विरोधी पक्षाला आवडतात 

googlenewsNext
ठळक मुद्देबदल स्वीकारता येत नसल्याने शेतकरी अडचणीत

- विजय मुंडे 

जालना : शेतकरी संघटनेने आपल्या चळवळीत ‘शिक बाबा शिक लढायला शिक’ सारख्या कविता वापरल्या. ही कविता म्हणत सदाभाऊ खोत मंत्री झाले. राजू शेट्टी खासदार झाले. मात्र, ही कविता सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षातील लोकांना जास्त आवडते, असे सांगत मला काही मिळावं म्हणून मी कविता करीत नाही. पण समाजाला या कवितेने खूप फायदा झाल्याचे मत कवी इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केलं.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जालना येथे आयोजित प्रतिभा संगम साहित्य संमेलनात रविवारी कवी इंद्रजित भालेराव यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी डॉ. संजीवनी तडेगावकर, विकास वाघमारे यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देताना भालेराव यांनी आपल्या साहित्य जीवन प्रवासाचा थोडक्यात उलगडा केला.  शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट  आहे.  शेतकरी आत्महत्येची सुरूवात मराठवाड्यात झाली. लातूर जिल्ह्यातील हळी हंडरगुळी गावात पहिली शेतकरी आत्महत्या झाली. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर समोर आलेले वास्तव हृदयाला भिडून गेले आणि ‘शिक बाबा शिक लढायला शिक’  ही कविता तयार झाली. 

प्रश्नांची उत्तरे तरूणांचीच शोधावीत
आजच्या तरूणांसमोर पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली तर गुंता वाढेल. त्यामुळे तरूणांनीच त्यांच्यासमोरील प्रश्नांची उत्तरे शोधावीत. आज अनेक युवक उत्तरे, उपाय शोधत पुढे येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत नवोदित कवी, लेखकांनी सर्वांगीण साहित्य वाचनावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

बदल स्वीकारता येत नसल्याने शेतकरी अडचणीत
गावाचा विकास करताना जे मॉडेल निवडलं, जी साधनं निवडली ती घाईघाईनं निवडली. ७२ च्या दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी हायब्रीड निवडलं मात्र, तेच विष झाले. आपण गावाच्या विकासासाठी जे निवडलं त्यातून झपाट्याने बदल झाले. हे बदल एकदम स्वीकारणे शक्य नसल्याने  शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मत भालेराव यांनी व्यक्त केले.आपण प्रसिध्दीसाठी हव्या त्या तडजोडी करतात? या प्रश्नाला भालेराव यांनी सडेतोड उत्तर दिले. मला काही मिळवायचं असते तर मी गत पाच वर्षे  या व्यासपीठावर स्वत:ला मिरविले असते. आज हे व्यासपीठ ज्या विचाराचे आहे त्या विचाराची सत्ता नाही. मी शासनाची, विद्यापीठाची कोणतीही आॅफर स्वीकारत नाही. कोणत्याही संस्था, संघटनेत सदस्यही नाही. मी स्वतंत्र आहे. माजी मुख्यमंत्री आर.आर.पाटील हे तीन वेळा घरी आले. माझ्या मित्राला म्हणाले, इंद्रजित भालेराव काहीच मागत नाहीत. मला काही पाहिजे असते तर मी त्यावेळीच घेऊ शकलो असतो, असे सांगताना कवी नरेंद्राच्या रूक्मिणी स्वयंवराची कहाणी सांगून कवीकुळाला बट्टा लागू नये, हे आमचे कवीकुळत्व असल्याचे भालेराव यांनी सांगितले.
 

Web Title: '...learn to fight'; My poems love the opposition : Indrajeet Bhalerao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.