हडपलेली जमीन परत करण्याचे सावकाराला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:07 AM2018-01-14T00:07:21+5:302018-01-14T00:07:30+5:30

सावकाराकडून घेतलेले कर्ज व्याजासह परत करूनही कर्जापोटी लिहून दिलेली जमीन परत करण्याचे आदेश येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था न्यायालाने सावकारास दिले आहेत.

Lender ordered to return the land | हडपलेली जमीन परत करण्याचे सावकाराला आदेश

हडपलेली जमीन परत करण्याचे सावकाराला आदेश

googlenewsNext

जालना : सावकाराकडून घेतलेले कर्ज व्याजासह परत करूनही कर्जापोटी लिहून दिलेली जमीन परत करण्याचे आदेश येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था न्यायालाने सावकारास दिले आहेत. हेलस (ता.मंठा) येथील जनाबाई विठ्ठल खराबे व इतरांनी जिल्हा सहकार उपनिबंधक यांच्याकडे सावकारी अधिनियमानुसार तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणातील अर्जदार व वडिलांची हेलस येथील गट क्रमांक ६१५-१६ मधील साडेसहा एकर जमीन सावकार विष्णू जेमला राठोड (रा. कर्नावळ.ता. मंठा) याने २५ लाखांच्या सावकारी कर्जाच्या बदल्यात खरेदीखत करून घेतली होती. अर्जदाराच्या वडील व आजोबांनी मूळ रकमेसह पाच टक्के व्याजाने साडेसदतीस लाख पन्नास हजार रुपये साक्षीदारांसोबत सावकारास परत केले होते. त्यानंतर जमिनीचे खरेदीखत परत करण्याची विनंती केली होती. मात्र, सावकाराने तसे केले नाही. दरम्यान अर्जदाराच्या आजोबांचे निधन झाले. सावकाराने जमिनीवर ताबा करण्याचा प्रयत्न केला. सावकारी त्रासाला कंटाळून अर्जदाराच्या आई लक्ष्मीबाई यांनी १६ मे २०१७ विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी सावकाराविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मंठा सहकारी निबंधक कार्यालयातही तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये सावकार राठोड यांच्या घरात कोरे बॉन्ड, धनादेश, खरेदीखताच्या झेरॉक्स, सातबारा आढळून आले. अर्जदाराने अ‍ॅड. बी.बी. शिराळे यांच्या वतीने हे प्रकरण जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल केले. जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून अर्जदाराचे वडील व आजोबांनी लिहून दिलेली जमीन सावकारी अंतर्गत येत असल्याने खरेदीखत अवैध घोषित करून रद्द करण्यात येत असून, ते अर्जदार व त्यांच्या वारसदारांना परत करण्याचे आदेश दिले. तसेच सावकारी अधिनियमानुसार संबंधित सक्षम अधिकारी यांनी आदेशाच्या अंमलबजावणीअंतर्गत सदर जमिनीचा तसा फेर करावा, असे आदेश जारी केले.
सावकारीच्या चौकशी अहवालाबाबत टाळाटाळ
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील शेवता येथील शेतकरी माधव गीताराम देशमुख यांनी गावातील सावकार आसाराम लिंगसे यांच्याकडून २००४ मध्ये २५ हजार रुपये पाच टक्के व्याजाने घेतले होते. या बदल्यात दीड एकर जमिनीचे गहाण खत सावकाराच्या मुलाच्या नावे करून दिले होते. देशमुख यांनी मूळ रकमेसह व्याज देऊनही सावकाराने जमिनीचा ताबा त्यांना दिला नाही. या संदर्भात देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे सावकारी अधिनियमानुसार तक्रार केली होती. या प्रकरणाच्या चौकशीत घनसावंगीचे सहायक निबंधक ए.एफ. आराख यांनी सावकाराच्या घरावर टाकलेल्या छाप्यात गहाण खत करून घेतलेली अनेकांची कागदपत्रे आढळून आल्याचे देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणी सुनावणी घेण्यासाठी देशमुख यांना सहायक निबंधकांनी वकील लावण्याचे सांगितले. सहायक निबंधक सावकाराची चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार देशमुख यांनी केली आहे. या संदर्भात सहायक निबंधक ए.एफ.आराख यांना विचारले असता, प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Lender ordered to return the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.