शेतातील हौदात पडला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:24 AM2017-12-06T00:24:54+5:302017-12-06T00:25:38+5:30
तळणी : मंठा तालुक्यातील नायगाव परिसरातील शेतात हौदात बिबट्या पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहिल्यांदाच बिबट्या आढळून आल्याने सर्वत्र ...
तळणी : मंठा तालुक्यातील नायगाव परिसरातील शेतात हौदात बिबट्या पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहिल्यांदाच बिबट्या आढळून आल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल दोन तास होऊनही घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी पोहोचले नव्हते. घटनेची माहिती पालकमंत्री लोणीकर यांना दिल्यानंतर त्यांनी संबंधिताना सूचना केली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले.
नायगाव (ता. मंठा) येथील एकनाथ हरिभाऊ फुफाटे यांच्या शेतातील गट क्र. ६९ मध्ये एक हौद असून 'त्या' हौदात ३ वाजेदरम्यान नारायण भानुदास फुफाटे हे शेतात जात असताना बिबट्याचा आवाज आल्याने हौदात पाहिले तर बिबट्या पडलेला दिसला. त्यांनी कळविल्यावर सरपंच गजानन फुफाटे व उपसरपंच अविनाश राठोड घटनास्थळी आले. त्यांनी महसूल व वन विभागाला माहिती दिली. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत घटनास्थळी कोणीच पोहोचले नसल्याने पालकमंत्री बबनराव लोणीकर यांना कळविले. त्यांनी सूचना केल्यानंतर वनरक्षक अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. बघ्यांची गर्दी जमली होती. त्याचबरोबर ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण पसरले होते.