आता फोडणी द्यायची कशाची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:17 AM2018-01-03T00:17:09+5:302018-01-03T00:17:24+5:30
आव्हानासह परिसरात गव्हाचे पीक जोमात असून, तणनाशकाच्या अतिवापराने मोहरीचे आंतरपीक मात्र नष्ट झाल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आव्हाना : आव्हानासह परिसरात गव्हाचे पीक जोमात असून, तणनाशकाच्या अतिवापराने मोहरीचे आंतरपीक मात्र नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. भविष्यात मोहरी हद्दपार होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गव्हातील तण गवत कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर होत आहे. त्यामुळे निंदाईचा खर्च कमी होत असला तरी मोहरीसारखे आंतरपीक नष्ट होऊ लागले आहे. मोहरी पीक स्वतंत्ररीत्या खूप कमी प्रमाणात घेतले जाते. आंतरपीक म्हणूनच मोहरीचे पीक सर्वत्र दिसून येते. पण तणनाशकाने हे पीक समूळ नष्ट होऊ लागले आहे. तणनाशकाचा मोहरी या पिकावरच नव्हे तर गव्हाच्या उत्पन्नावर देखील विपरीत परिणाम होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
मजूर मिळत नाही म्हणून तणनाशकाचा वापर होत असून, त्याचा वापर अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. जमिनीचा पोत कमी होणे, तण म्हणजेच गवतातून जनावरांना मिळणारा चारा न निघणे या बाबी शेतक-यांसाठी तोट्याच्याच आहेत. मजुरांची कमतरता, वेळेचा अभाव यामुळे शेतकरीवर्ग तणनाशकाकडे वळत असला तरी हे फार काळ सुरु ठेवणे परवडणारे नाही. पुढील काळात शेती ही नापीक होण्याची चिन्हे दिसत आहेत.