'झालं गेलं विसरून जाऊ'; रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दिलजमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 02:50 PM2024-11-11T14:50:22+5:302024-11-11T14:52:24+5:30

लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर खोतकर व दानवे यांच्यात मोठा राजकीय दुरावा निर्माण झाला.

'Let's forget what's done'; patch up again between Raosaheb Danave and Arjun Khotkar | 'झालं गेलं विसरून जाऊ'; रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दिलजमाई

'झालं गेलं विसरून जाऊ'; रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दिलजमाई

- फकिरा देशमुख
भोकरदन( जालना) :
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुरावलेले माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे व शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात पुन्हा दुसऱ्यांदा दिलजमाई झाली. झाले गेले विसरून विधनसभा निवडणुकीत आपण एकमेकाचे काम करू, असे दोघांनीही पत्रकारांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर खोतकर व दानवे यांच्यात मोठा राजकीय दुरावा निर्माण झाला. विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर हे महायुतीचे जालन्यातून उमेदवार आहेत तर रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्करराव दानवे यांनीही येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, दानवे यांनी अर्ज मागे घेतला. परंतु, जालन्यात भाजपचे कोणतेही कार्यकर्ते खोतकर यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याने खोतकर अडचणीत सापडले आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जालन्यात प्रचार सभा आहे. सभेसाठी आपण यावे म्हणून अर्जुन खोतकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी आज सकाळी ७ वाजता रावसाहेब दानवे यांचे भोकरदन येथील निवस्थान गाठले. मात्र, दानवे प्रचारासाठी ग्रामीण भागात गेले होते. खोतकर यांनी दानवे यांना फोन करून आपण घरी आलो आहोत, असा निरोप दिला. त्यानंतर दानवे घरी आले.

दानवे - खोतकर तब्बल २ तास चर्चा
दरम्यान, खोतकर आणि दानवे यांच्यात तब्बल दोन तास खलबत्ते झाली. त्यामध्ये मागच्या अनेक चुकावर प्रकाश टाकण्यात आला. आता आपण झाले गेले विसरून पुढे काही चुका होणार नाही असा शब्द दानवे आणि खोतकरांनी एकमेकांना दिला. पुन्हा महायुतीचा सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिवसेना शिंदे यांचे पदाधिकारी विशाल गाढे, भुषण शर्मा, यांची उपस्थिती होती.

रावसाहेब दानवे यांनी आशीर्वाद दिला
माजी राज्यमंत्री तथा जालना मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सांगितले की, मी जालन्यातुन महायुतीचा उमेदवार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जालना येथे सभा आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी व दानवे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज येथे आलो. दानवे यांनी मला आशीर्वाद दिला आहे, ते माझ्या प्रचारासाठी येणार आहेत. मागच्या काळात जे काही मतभेद होते, गैरसमज होते ते दूर झाले आहेत. यापुढे आमच्यात कोणताही दुरावा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, आमचे कार्यकर्ते सुध्दा भोकरदन मतदार संघात संतोष दानवे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतील असे खोतकर यांनी सांगितले.

जुन्या वादावर पडदा
माजी केंद्रिय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, मी राज्य पातळीवर काम करणारा नेता आहे. आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी जाऊन महायुतीसाठी सभा घेतल्या. त्यामुळे जालन्यात जाता आले नाही. मी पक्षशिस्त पाळणारा, त्यामुळे खोतकर आले नसते तरीही मी महायुतीचा प्रचार करणार होतो. मात्र अर्जुनराव खोतकर घरी आले. आमच्यात चर्चा झाली, मागे काय झाले यावर पडदा टाकून पुढे एकत्र काम करण्याचे ठरले आहे. मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जाणार आहे.  माझा लोकसभेत जो पराभव मान्य करून परत कामाला लागलो आहे. मी खचून जाणारा कार्यकर्ता नाही असे दानवे यांनी सांगितले.

Web Title: 'Let's forget what's done'; patch up again between Raosaheb Danave and Arjun Khotkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.