.....अखेर कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:33 AM2021-03-09T04:33:41+5:302021-03-09T04:33:41+5:30
मंठा - येथील लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचारी कायम गैरहजर राहत होते. यामुळे कार्यालयीन कामकाज खोळबंले होते. याबाबत ...
मंठा - येथील लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचारी कायम गैरहजर राहत होते. यामुळे कार्यालयीन कामकाज खोळबंले होते. याबाबत लोकमतने ३ फेब्रुवारी रोजी लघु पाटबंधारे विभागातील कर्मचारी कायम गैरहजर या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन उपविभागीय अभियंता डी.एन. श्रीवास्तव यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मुख्यालयी हजर राहण्यासाठी पत्र काढले आहे.
मंठा येथील लघु पाटबंधारे उपविभाग हे कार्यालय या अगोदर वाटूर फाटा येथे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर हे कार्यालय मंठा येथे हलवण्यात आले. या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी डी. एन. श्रीवास्तव हे औरंगाबादला आणि इतर शाखा अभियंता व्ही.डी. वाघमारे, सहाय्यक अभियंता काझी, काळे, सोळंके, कनिष्ठ लिपिक नागरे हे सर्व कर्मचारी बाहेरगावी वास्तव्यास असतात. त्यामुळे कार्यालयात फक्त शिपाई सानप हेच हजर राहत होते. अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील अनुपस्थितीमुळे तालुक्यातील तलावांची कामे रखडली आहेत. खोरड सावंगी, तळतोंडी, बरबडा, पाटोदा या धरणांची कामे अर्धवट आहे. या तलावासाठी शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन शासनाने अधिग्रहित केली आहे. त्या जमिनीमध्ये खोदकाम झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही. शासनाकडून पूर्ण मोबदलाही मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. अशातच या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी हजर राहत नसल्याने कामे खोळंबली होती. याबाबत लोकमतने ३ फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहे.
उपविभागीय अभियंताच राहतात गैरहजर
लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता डी.एन. श्रीवास्तव यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहा म्हणून पत्र काढले आहे. परंतु, स्वतःच तेच कार्यालयात हजर राहत नसल्यामुळे इतर कर्मचारी देखील कार्यालयात हजर राहत नाहीत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
===Photopath===
080321\08jan_23_08032021_15.jpg~080321\08jan_24_08032021_15.jpg
===Caption===
प्रकाशित केलेली बातमी~कर्मचार्याला दिलेले पत्र