सासऱ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्या जावयास जन्मठेप
By दिपक ढोले | Published: March 23, 2023 07:30 PM2023-03-23T19:30:20+5:302023-03-23T19:39:38+5:30
''तुम्ही खूप दारू पिता, माझ्या मुलीला मारहाण करून त्रास देता. तुमच्या आई-वडिलांना घेऊन या, नंतरच मी मुलीला पाठवतो''
जालना : सासऱ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्या जावयास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. नागोराव सर्जेराव पवार (रा. गोळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे.
२० मे २०२२ रोजी फिर्यादी व मयत मुक्तीराम आबाजी इंगोले हे आष्टी येथे बाजार करून डॉ. थोरात यांच्या दवाखान्याकडे जात असताना त्यांना आरोपी नागोराव पवार हा भेटला. माझ्या बायकोला घ्यायला आलो, असे तो म्हणाला. तुम्ही खूप दारू पिता, माझ्या मुलीला मारहाण करून त्रास देता. तुमच्या आई-वडिलांना घेऊन या, नंतरच मी मुलीला पाठवतो, असे मुक्तीराम इंगोले त्याला म्हणाले. या बोलण्याचा राग आल्याने नागोराव पवार याने मुक्तीराम इंगोले यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात मुक्तीराम इंगोले हे जखमी झाले.
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा २५ मे २०२२ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषाराेपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. भारत खांडेकर यांनी काम पाहिले.