चोरट्यांच्या शोधासाठी ‘लिली’ ठरतेय मार्गदर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:22 AM2019-07-14T00:22:27+5:302019-07-14T00:22:45+5:30
या तंत्रज्ञानाच्या युगातही जिल्हा पोलीस दलातील ‘डॉग स्कॉड’मध्ये कार्यरत असलेल्या ‘लिली’ने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.
विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दरोडे, चोऱ्या, खुनाच्या इतर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पोलीस अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. या तंत्रज्ञानाच्या युगातही जिल्हा पोलीस दलातील ‘डॉग स्कॉड’मध्ये कार्यरत असलेल्या ‘लिली’ने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. चालू वर्षात घडलेल्या खून, दरोड्यांसह चोऱ्यांच्या ४३ प्रकरणात ‘लिली’ने पोलिसांना घटनास्थळावरून आरोपींचा मार्ग दाखविला आहे.
विविध पोलीस ठाण्यांतर्गत घडणा-या खून, दरोडे, चो-यांच्या घटनानंतर श्वान पथकाला पाचरण केले जाते. जिल्हा पोलीस दलातील श्वान पथकामधील ‘लिली’ने चालू वर्षात ४३ घटनास्थळावरून चोरट्यांसह संशयितांचा माग घेतला आहे. पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथकातील अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. एखाद्या घटनास्थळावरून कॉल आल्यानंतर हे पथक तात्काळ तेथे हजर होते. घटनास्थळावरून चोरटे, संशयित आरोपी जिथपर्यंत चालत जातात, तिथपर्यंतचा मार्ग हे श्वान पथक पोलिसांना दाखवित आहे. दोन दिवसांपूर्वी गोंदी हद्दीत पडलेल्या दरोड्यातील दरोडेखोरांचा मागही ‘लिली’ने घेतला होता. एका ठिकाणी चोरीस गेलेल्या मोबाईलमधील सीमकार्डसह इतर वस्तू पोलिसांना सापडल्या आहेत. तर दुधी काळेगाव येथील व पारध येथील खून प्रकरणातही संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी या पथकाने पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना मदत केली आहे.
दैनंदिन घेतला जातो सराव
श्वानपथक विभागाचे प्रमुख फौजदार बी.एस.कबले, हॅन्डलर एस.पी. नेलवार, पी.के हावाळे व त्यांचे सहकारी ‘लिली’चा सराव घेतात. आरोग्य तपासणी, दैनंदिन खाद्य यासह इतर बाबीही हे अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून असतात.
दाखल होणार ‘लुस्सी’
जालना पोलीस दलातील श्वान पथकात सध्या एकमेव ‘लिली’ कार्यरत आहे. एकाच दिवशी दोन ठिकाणी गरज पडली तर घटनास्थळी पोहोचताना दमछाक होते.
ही बाब पाहता पोलीस दलाच्या वतीने वाढीव श्वानाची मागणी करण्यात आली होती. या मागणीला वरिष्ठांनी मंजुरी दिली असून, जिल्हा पोलीस दलात लवकरच ‘लुस्सी’ नावाचा डॉग दाखल होणार आहे.