काळजीपूर्वक 'ऐका', कायमचे बहिरेपण येण्याच्या प्रमाणात २५ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:58 PM2024-07-03T18:58:06+5:302024-07-03T19:02:06+5:30

श्रवणदोष यंत्र मागणीत वाढ, लहान मुलांची बेरा ऑडिओमेट्रीची चाचणी करण्याकडे पालकांचा कल

'Listen' carefully, 25 percent increase in rate of permanent deafness | काळजीपूर्वक 'ऐका', कायमचे बहिरेपण येण्याच्या प्रमाणात २५ टक्क्यांनी वाढ

काळजीपूर्वक 'ऐका', कायमचे बहिरेपण येण्याच्या प्रमाणात २५ टक्क्यांनी वाढ

जालना : प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना ऐकू येणे बंद झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. अशाच प्रकाराची श्रवण क्षमता कमी झाल्याचे अनेक रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. जिल्ह्यात मागील तीन वर्षांतील श्रवणदोष तपासणीची आकडेवारी बघता तपासणीसाठी आलेल्या २५ टक्के रुग्णांमध्ये कायमचे बहिरेपणा येण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याची रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात मराठवाड्यातील पहिले अत्याधुनिक श्रवणदोष तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून आजपर्यंत हजारो रुग्णांची श्रवणदोष तपासणी करण्यात आली आहे. वयोवृद्धपणामुळे ज्येष्ठांमध्ये श्रवणक्षमता कमी होते. मात्र, हल्ली डोक्याला गंभीर दुखापत होणे, तासनतास कानात हेडसेट लावून तीव्र आवाजात गाणी ऐकणे, गेम खेळणे, डिजे लावून गाणी ऐकणे, तसेच नेहमी कर्णकर्कश आवाजाच्या सान्निध्यात राहणे, अशा गोष्टीमुळे कानाच्या आतील नाजूक पडद्यांच्या नसा फाटतात. यामुळे कमी वयातील व्यक्तीमध्येदेखील श्रवणदोष आजाराचे प्रमाण वाढत आहे.

सन २०२० ते २०२४ दरम्यान करण्यात आलेली श्रवणदोष तपासणी
मार्च २०२० ते एप्रिल २०२१ - १४४५
२०२१ ते २०२२ - १७५० 
२०२२ ते २०२३- १८८०
२०२३-२०२४ - ११५

बाळाच्या बेरा चाचणीकडे कल
हल्ली मुले जन्माला आल्यानंतर काही तासांच्या अंतराने किंवा महिन्यातच त्या बाळाची आयक्यु लेवल तपासणी करण्याची मागणी वाढत आहे. ही चाचणी बाळ जन्मल्यानंतर केली जाते. यामध्ये बाळ झोपेत असताना ही चाचणी करावी लागते, त्यामुळे बाळ जन्माने बहिरे असल्यास पुढील उपचार करणे सोपे होते. पालकांकडून बाळाची बेरा चाचणी करण्याची मागणी वाढली आहे.

डॉक्टरांशी संपर्क साधावा
जिल्ह्यातीलच नव्हे, तर मराठवाड्यातील अत्याधुनिक असे श्रवणदोष तपासणी केंद्र जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे. त्याद्वारे रुग्णांची श्रवणदोष तपासणी करून योग्य उपचार करणे सहज शक्य आहे. कमी ऐकू येत असल्याची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ. प्रियंका शिंदे, ऑडिओमेट्री विभाग, जालना.

उपचार शक्य
लहान मुलांची बेरा चाचणी करण्यासाठी पालक स्वत:हून आमच्याकडे येत आहेत, कारण कमी वयात बाळाची श्रवण चाचणी झाली आणि त्यात बालकास श्रवणदोष आढळल्यास पुढील महागडे उपचार अगदी स्वस्तात करणे शक्य होते.
- डॉ. कीर्ती कराडकर, कान, नाक, घसा तज्ज्ञ विभाग, जालना.

Web Title: 'Listen' carefully, 25 percent increase in rate of permanent deafness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.