अभंग, भाव आणि भक्तिगीतांनी रसिक भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 01:04 AM2019-04-07T01:04:42+5:302019-04-07T01:05:50+5:30
माझे माहेर पंढरी..., काटा रूते कुणाला..., घेई छंद मकरंद..., बाजे रे मुरलिया..., या व अन्य भाव, भक्ती आणि नाट्य गीतांंनी जालनेकरांची शुक्रवारची संध्याकाळ अजरामर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : माझे माहेर पंढरी..., काटा रूते कुणाला..., घेई छंद मकरंद..., बाजे रे मुरलिया..., या व अन्य भाव, भक्ती आणि नाट्य गीतांंनी जालनेकरांची शुक्रवारची संध्याकाळ अजरामर केली. निमित्त होते ते गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मर्मबंधातील ठेव या संगीत मैफिलीचे.
येथील रूक्मिणी गार्डनमध्ये प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या मैफलीत जालनेकर रसिकांची लक्षणीय उपस्थिती लावली होती. प्रारंभी मतदान जागृती करणारे संदेश देण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी लागली समाधी ज्ञानेशाची हा अभंग प्रथमेश लघाटे यांनी सादर केला. तर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग मुग्धा वैशंपायन यांनी सादर करून रसिकांना भक्तिरसात नेले. यावेळी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले काटा रूते कुणाला आक्रंदात कोणी मज फूलही रूतावे हा दैवयोग आहे. हे रंजित देसाई लिखित हे बंध रेशमाचे या नाटकातील पद प्रथमेश लघाटे यांनी सादर केले.
या व अन्य गाण्यांसह अनेक भक्तिगीते सादर करण्यात आली. यावेळी गायिका मुग्धा वैशंपायन हिचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी तबल्यावर प्रथमेश देवधर, पखवाज उद्धव गोळे, हार्मोनियम उमेश पुरोहित, विश्वास कलमकर, अविनाश थिगले यांनी ही मैफल यादगार व्हावी म्हणून पुढाकार घेतला. सूत्रसंचालन किशोर देशपांडे यांनी केले.