साहित्यिकांनी शेतक-यांचे शब्द व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:35 AM2018-01-29T00:35:44+5:302018-01-29T00:36:13+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील लोककवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीत मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या वतीने पहिले नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
जालना : देशातील स्त्री आणि शेतकरी संकटात सापडलेले असून ते फारसे व्यक्तही होऊ शकत नाहीत. साहित्यिकांनी त्यांचे शब्द होण्याची गरज आहे. यासाठी अशा प्रकारची संमेलने होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कॉ. अमर हबीब यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील लोककवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीत मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या वतीने पहिले नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष साहित्यिक ललित अधाने, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, स्वागताध्यक्ष शाम सिरसाट, गझलकार सुनंदा पाटील, सामाजसेवक दत्ता बारगजे, माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप जाधव, मराठवाडा युवा साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणधीर, मंडळाचे सचिव अच्युत मोरे, कोषाध्यक्ष साहिल पाटील, शाहीर आप्पासाहेब उगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
अमर हबीब म्हणाले की, साहित्यकांनी सृजनांचा वाली झाले पाहिजे. प्रत्येकातले माणूसपण जागे झाल्याशिवाय ख-या साहित्याची निर्मिती होऊ शकत नाही. हा जिल्हा हा आतापर्यंत कसदार बियाणे उत्पादनांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु यापुढे हा जिल्हा साहित्याचे कसदार बियाणे असलेला जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असेही ते म्हणाले. साहित्याच्या माध्यमातून सत्याची मांडणी केली पाहिजे. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी साहित्यिकांचे फार मोठे योगदान आहे, असे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आपले विचार मांडताना सांगितले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम सिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथाला पालखीत नाही तर डोक्यात घेण्याची गरज असून, युवकांनी सामाजिक भावनेतून सकारात्मक कार्यात आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या पदाधिका-यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. संमेलनानिमित्त दिवसभरात कविसंमेलन, परिसंवाद, पुरस्कार वितरण इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
--------------
युवकच बदल घडवू शकतात - ललित अधाने
संमेलनाध्यक्ष डॉ.ललित अधाने म्हणाले, की जगातील सर्व क्रांतिकारक बदल युवकांनी घडवून आणले आहेत. देश घडवण्यात तरुणाईची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्या देशाच्या विकासाचे मूल्यमापन केले जाते, तेव्हा त्या देशाची शिक्षणव्यवस्था कशी आहे? त्या देशातला तरुण स्वहित व देशहिताकरिता कितपत गंभीर आहे? तो काय करतो? त्या देशातील साहित्य किती गंभीरपणे लिहिले वाचले जाते, यावर केले जाते. मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या सर्व पदाधिका-यांचे संमेलनाच्या आयोजनाबद्दल त्यांनी कौतुक केले.
-------