महानुभाव पंथातील तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी जालन्यात साहित्य मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:40 PM2018-12-19T13:40:30+5:302018-12-19T14:01:15+5:30

जालन्यात २३ आणि २४ डिसेंबर असे दोन दिवस २४ वे अ.भा. महानुभाव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

literature Meet in Jalna for the promotion of Mahanubhav Sect Philosophy | महानुभाव पंथातील तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी जालन्यात साहित्य मेळा

महानुभाव पंथातील तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी जालन्यात साहित्य मेळा

googlenewsNext

जालन्यात २३ आणि २४ डिसेंबर असे दोन दिवस २४ वे अ.भा. महानुभाव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन भरविण्यामागील प्रेरणा आणि गरज याविषयी संमेलनाचे संयोजक महंत प्रज्ञासागर महाराज यांच्याशी ‘लोकमत’चे संजय देशमुख यांनी केलेली बातचीत. 

प्रश्न - महानुभाव साहित्य संमेलन भरविण्यामागचा हेतू काय?
- संमेलनाच्या माध्यमातून लिळाचरित्रात चक्रधर स्वामींनी जे तत्वज्ञान घालून दिले आहे. त्याचा प्रचार व प्रसार करण्यासह महानुभाव पंथाचे तत्वज्ञान काय हे सर्वांसमोर नेण्याच्या उद्देशाने जालन्यात हे संमेलन होत अहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आ. राजेश टोपे आहेत. 

प्रश्न - महानुभाव पंथाच्या इतिहासाबाद्दल काय सांगाल?
- महानुभाव पंथाला मोठा  इतिहास आहे. मराठी भाषेला समृध्द करणारा पंथ म्हणून याची ओळख आहे. बोली भोषेतून तत्वज्ञान आणि अन्य विचार सांगितल्यास ते चटकन कळतात. या विचारातूनच महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांनी गोवोगाव फिरून मानवतेला प्राधान्य दिले आहे. जात-पात, धर्म, पंथ न मानता प्रत्येकाकडे सहिष्णूतेने वागले पाहिजे.  तसेच स्त्री-पुरूष समानता  आणि स्त्री शिक्षणाची गरज ही चक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात ओळखली होती आणि त्यावेळी त्यांची अंमलबजावणीही केली.  त्यावेळीही त्यांना विरोध झाला होता. या विरोधाला न जुमानता त्यांनी परिवर्तनाला महत्व दिले. महदंबा या मराठीतील आद्य कवयत्रिला मार्गदर्शन करून चक्रधर स्वामींनी तिला त्या काळात लिहिते केले. त्यामुळे साहित्य जगतात महदंबेला आद्य कवयत्रीचा सन्मान दिला आहे. 

प्रश्न - आद्य कवयत्री महदंबा आणि जालन्याचे नाते काय?
- जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रामसगाव हे या आद्य कवयत्रीचे मूळ गाव. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. चक्र्रधर स्वामींनी लिळाचरीत्रात सांगितलेले मर्म सूत्रपाठाच्या माध्यमातून सर्र्वांपर्यंत पोहचविण्याचे कार्य तत्कालिन पंडित व्यास यांनी केले आहे. चक्रधर स्वामींनी विदर्भातील रामटेक ते बीड आणि नंतर त्र्यंबकेश्वर ते राहेर असे पदभ्रमण केले. ते ज्या ज्या ठिकाणी थांबले ते मठ म्हणजेच तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात. असे एकूण १६५० तीर्थस्थळे आहेत. 

प्रश्न - महानुभाव पंथ आणि प्रपंच याविषयी काय सांगाल?
महानुभाव पंथात जीव, देवता, परमेश्वर आणि प्रपंच यावर आधारित आहे. भगवान श्रीकृष्ण, दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रधर स्वामी आणि गोंविंद प्रभू यांना महत्व देऊन त्यांची पूजा-अर्चा करतो. लिळाचरित्र आणि सूत्रपाठ म्हणजे या पंथाचे वेद आहेत. महानुभाव पंथ हा सर्वांना समान मानणारा पंथ आहे. स्त्री-पुरूष भेद मान्य नसून, सर्व प्राणिमात्रांसंदर्भात आस्था, कोणाविषयी निंदा-नालस्ती न करणे तसेच सहिष्णूता आणि अहिंसेलाही मोठे महत्व या पंथात आहे. चक्रधर स्वामींनी लिळाचरित्रातून जे निरूपण सांगितले आहे. त्या निरूपणांना या पंथात अनन्य साधारण महत्व आहे. इतर भक्तीलाही पंथात मोठे स्थान आहे. 

प्रश्न - साहित्य संमेलनास कोणाची उपस्थिती राहणार?
- जालन्यात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनात आचार्य लोणारकर बाबा, आचार्य बाबूळगावकर बाबा, आचार्य सेवलीकर बाबा, आचार्य कळमकर बाबा, तपस्वीनी आचार्य सुभद्रा आत्या, उपाख्य कुलाचार्य न्यायम बाबा, आचार्य खामणिकर बाबा, अखिल भारतीय महानुभाव  साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. पुरूषोत्तम नागपूरे, उपाख्य पुरूषोत्तम कारंजेकर बाबा यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपसिथती राहणार आहे. 

प्रश्न - ऐतिहासिक संदर्भासाठी काही पुस्तकप्रदर्शने असणार आहेत का?
- होय, ग्रंथसंपदेची मोठी पर्वणी या काळात असणार आहे. महानुभाव पंथाने सहा हजार ५०० ग्रंथ आणि पोथी आहेत. १९२० मध्ये पुणे येथील प्राच्यविद्या भांडारकर वाचनालयाने महानुभाव पंथातील ५०० कवींची एक यादी प्रसिध्द केली होती. त्यावरून या पंथात किती दर्जेदार साहित्य आहे हे दिसून येते.  लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते, त्यावेळी तत्कालीन अधिवेशनाचे अध्यक्ष कै. बाळ गंगाधार  टिळकांनी तेथे सुरू असलेल्या महानुभाव पंथाच्या धार्मिक प्रवचनास भेट देऊन त्या संदर्भातील अग्रलेख केसरी या वृत्तपत्रात छापला होता. यावरून हा पंथ त्या काळात संपूर्ण भारतभर पसरला होता हेच दिसून येते.  अशी अनेक महत्त्वपूर्ण संदर्भ असलेली पुस्तके या ग्रंथप्रदर्शनात भेटतील. 

 ( शब्दांकन - संजय देशमुख, जालना
 

Web Title: literature Meet in Jalna for the promotion of Mahanubhav Sect Philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.