लॉकडाऊनमध्ये पती-पत्नींमध्ये कुरबुरी वाढल्या; स्वयंपाकासह घरकामावरून होतायत घराघरामध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:07 PM2020-11-04T19:07:17+5:302020-11-04T19:09:02+5:30
कोरोनाच्या संकटातही पती-पत्नींमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याचे पुढे आले आहे
जालना : कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांची नोकरी गेली आणि प्रशासकीय सूचनांमुळे घरातही कैद राहावे लागले. मात्र, कोरोनाच्या संकटातही पती-पत्नींमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याचा प्रकार महिला तक्रार निवारण कक्षात दाखल तक्रारींवरून समोर येत आहे.
दारू, मोबाईलचा अतिवापर, संशयी वृत्ती, यामुळे अनेकांच्या संसारात वाद निर्माण होत असून, हे वाद पोलीस ठाणे, कोर्टापर्यंत जात आहेत. तक्रारींनुसार पोलीस प्रशासन समुपदेशनाचे काम करीत आहे.
तक्रारींची कारणे
- मी शहरातील कंपनीत नोकरी केली. गावात नाही राहणार, शेतात काम नाही करणार.
- सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याचा अट्टाहास. मुलांचे वाढलेले व्यसनांचे प्रमाण.
- लग्नात राहिलेला हुंडा किंवा व्यवसायासाठी पैशांची सतत मागणी करणे.
- मूलबाळ न होणे, अनैतिक संबंध, अशा एक ना अनेक कारणांमुळे पती- पत्नींमधील वाद विकोपाला जात आहेत.
स्वभावातील बदल लक्षात घेणे गरजेचे
कोरोनामुळे अनेकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. ज्यांची नाेकरी गेली किंवा व्यवसायात तोटा झाला अशांची मानसिक स्थितीही खालावलेली असते किंवा कुटुंबातील विविध कारणांमुळेही मानसिक तणाव येतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या स्वभावातील, मानसिकतेतील बदल तात्काळ लक्षात येणे गरजेचे आहे. मानसिक समुपदेशन आणि उपचार घेतले, तर भविष्यातील नुकसान टाळता येते.
-डॉ. एम.डी. मुळे, मानसाेपचारतज्ज्ञ
आजच्या युवा पिढीमध्ये वाढलेली व्यसनाधीनता ही पती- पत्नींमध्ये वाद होण्याचे मूळ कारण ठरत आहे. वाद टाळण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन निर्माण होणारे प्रश्न मार्गी लावावेत.
-एस.बी.राठोड, महिला सुरक्षा कक्ष
२५२
एकूण तक्रारी दाखल
१०८
तक्रारींचे निराकरण