तीन वर्षांपासून कुलूप; जालना जिल्ह्यातील २९ ग्रंथालयांची मान्यताच रद्द
By विजय मुंडे | Published: March 28, 2023 11:22 PM2023-03-28T23:22:03+5:302023-03-28T23:25:02+5:30
जिल्ह्यातील आणखी १८ ग्रंथालये कारवाईच्या रडारवर
जालना : तीन वर्षांपासून ग्रंथालये बंद ठेवून वार्षिक अहवाल न देणाऱ्या जिल्ह्यातील २९ ग्रंथालयांची मान्यता ग्रंथालय संचालकांनी रद्द केली आहे. शिवाय आणखी १८ ग्रंथालये कारवाईच्या रडारवर आहेत. त्यामुळे कागदोपत्री ग्रंथालये चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाचन संस्कृती रूजावी यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी, युवकांनी शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तकांचे वाचन करावे, यासाठीही प्रोत्साहन दिले जाते. वैविध्यपूर्ण वाचनामुळे मानवी बुद्धीचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने शहरी, ग्रामीण भागात वाचनालये सुरू करण्यास परवानगी दिली. अ, ब, क, ड अंतर्गत संबंधित वाचनालयांना अनुदान देण्याचा निर्णयही शासनस्तरावरून घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात १०-२० नव्हे तब्बल ४०८ ग्रंथालये सुरू झाली आहेत. या ग्रंथालयांमुळे ग्रामीण भागातील वाचकांच्या वाचनाची भूक भागत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना विविध पुस्तके वाचनास मिळत आहेत. परंतु, जिल्ह्यातील काही ग्रंथालय चालकांनी ग्रंथालयास कुलूप लावण्यासह वार्षिक अहवाल जिल्हा ग्रंथालय कार्यालयास दिला नाही. वेळोवेळी केलेल्या पाहणीत संबंधित ग्रंथालयांना कुलूप ठोकल्याचे दिसून आले. याचा अहवाल जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने ग्रंथालय संचालकांकडे पाठविण्यात आला होता.
जिल्ह्यातील ३६ ग्रंथालय चालकांना ग्रंथालय संचालकांनी नोटिसा बजावल्या होत्या. त्यातील सात जणांनी खुलासा दिला आहे. तर २९ जणांनी खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळे संबंधित ग्रंथालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आणखी १८ ग्रंथालये ही कायम बंद असण्यासह वार्षिक अहवाल देत नसल्याच्या यादीत आहेत. त्यामुळे संबंधित ग्रंथालयांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
२९ ग्रंथालयांची मान्यता रद्द
तीन वर्षांपासून ग्रंथालय बंद असणे, वार्षिक अहवाल न देणे आदी कारणांवरून जिल्ह्यातील २९ ग्रंथालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. जिल्हा ग्रंथालय कार्यालयाकडून ग्रंथालयांची वेळोवेळी तपासणी केली जाते.
- मनोज पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी
रद्द झालेली ग्रंथालये:
तालुका - ग्रंथालय
अंबड- ०४
घनसावंगी : ०८
जाफराबाद- ०४
जालना- ०७
बदनापूर- ०२
भोकरदन- ०३
मंठा - ०१