शाळेला ठोकले कुलूप...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 01:09 AM2019-10-10T01:09:41+5:302019-10-10T01:10:10+5:30
घनसावंगी तालुक्यातील साकळगाव केंद्रांतर्गत असलेल्या घोेन्सी तांडा - २ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शालेय समिती, पालकांनी बुधवारी शाळेला कुलूप ठोकले
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील साकळगाव केंद्रांतर्गत असलेल्या घोेन्सी तांडा - २ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शालेय समिती, पालकांनी बुधवारी शाळेला कुलूप ठोकले. शिक्षक मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
घोन्सी तांडा - २ येथे जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत दोन शिक्षकी शाळा आहे. या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती आहे. येथे ८४ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. दोनपैकी एक शिक्षकाची समायोजन अंतर्गत २० ते २५ दिवसापूर्वी बदली झाली. त्यामुळे एका शिक्षकांवर शाळेचा व विद्यार्थ्यांचा भार आला आहे. दुसऱ्या शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने शालेय समिती अध्यक्ष राम राठोडसह भीमराव चव्हाण, नारायण राठोड, ज्ञानेश्वर राठोड, रामभाऊ आडे, विष्णू आडे, अंकुश राठोड, अर्जुन चव्हाण, स्थानिक पालक व ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास शाळेला टाळे ठोकले. संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत दुसरा शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आमच्या शाळेत ८४ विद्यार्थी असून, सध्या या सर्वांना मी एकटा शिकवित आहे. शिक्षकाची रिक्त जागा भरावी, यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले. मागणी मान्य होईपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा ग्रामस्थांनी पवित्रा घेतल्याची माहिती वरिष्ठांना दिली आहे.
-संदीप घालमाणे, मुख्याध्यापक