Lok Sabha Election 2019 : आधी लगीन उमेदवारीच...लग्नाला जाण्याआधी शेतकरी पुत्राने दानवें विरोधात भरला उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 03:41 PM2019-03-28T15:41:53+5:302019-03-28T15:48:43+5:30
शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या राजकारण्याला हरविण्यासाठी अर्ज भरत असल्याचे त्याने यावेळी सांगितले.
जालना : सुदाम श्रीरंग इंगोले या तरुणाचे आज सायंकाळी लग्न आहे. मात्र लग्नाला जाण्याआधी त्याने जालना लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मित्रपरिवाराच्या वऱ्हाडासोबत आलेल्या सुदामाने शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या राजकारण्याला हरविण्यासाठी अर्ज भरत असल्याचे यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील धारकल्याण येथे राहणाऱ्या सुदाम इंगोले याचे शिक्षण एमए पर्यंत झाले आहे. आज सायंकाळी बदनापूर तालुक्यातील उज्जेनपुरी येथे त्याचे लग्न आहे. लग्नासाठी जमलेल्या मित्रपरिवारात त्याने लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार बोलून दाखवला. यानुसार लग्नाला जाण्याआधी त्याने मित्रपरिवाराच्या वऱ्हाडाच्या साक्षीने जिल्हाधिकारी कार्यालयात येत लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. नवरदेवाच्या पोशाखात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आलेल्या सुदाम हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
मी शेतकऱ्याचा मुलगा
मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांना शिवी देणाऱ्या राजकारण्यांचा पराभव करण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचे सुदाम याने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले. तसेच निवडणूकीत विजय प्राप्त करू असा आत्मविश्वास असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.