बंदुकीचा धाक दाखवून ७० हजारांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:09 AM2019-05-03T01:09:26+5:302019-05-03T01:09:55+5:30
भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरूणाला एअरगनचा धाक दाखवून ७० हजार रूपयाला लुटल्याची घटना मंगळवारी रात्री नवीन जालन्यातील महाकाली मंदिर चौकात घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरूणाला एअरगनचा धाक दाखवून ७० हजार रूपयाला लुटल्याची घटना मंगळवारी रात्री नवीन जालन्यातील महाकाली मंदिर चौकात घडली. लुटमार करणाऱ्या दोन जणांना सदर बाजार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील एअरगन जप्त करण्यात आली आहे.
नवीन जालन्यातील महाकाली चौकात ३० एप्रिल रोजीच्या साडेबाजरा वाजेच्या सुमारास दीपक भगत आणि यश फत्तेलष्कर यांच्या दोन गटात भांडण सुरू होते. यावेळी परिसरात राहणारा दीपक बंग ( २५) यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्यस्थी का करतो, असे म्हणून यश फत्तेलष्कर आणि त्याचा साथीदार प्रमोद भगत या दोघांनी दीपक बंग यास धक्काबुक्की करत त्याच्या जवळ असलेल्या एअरगन या गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून बंगच्या खिशातील १५ हजार रुपये आणि गळयातील सोन्याची साखळी असा ७० हजार रूपयांचा ऐवज हिसकावून घेतला. यावेळी बंग यास धमक्या देऊन दोघेही आरोपी पसार झाले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपी यश फत्तेलष्कर व प्रमोद भगत या दोघांविरूध्द भादंवि ३९२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अजब प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, भांडण सोडविण्यास आलेल्यानेच लुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.