चारशे गावांत ‘महादूध’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:02 AM2018-01-30T00:02:08+5:302018-01-30T00:02:18+5:30
पशुधनाची उत्पादकता वाढविणे, उत्पादित दुधाचे योग्य पद्धतीने संकलन, विपणन करून शेतक-यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी महादूध प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ४०१ गावांची निवड झाली
बाबासाहेब म्हस्के/जालना : पशुधनाची उत्पादकता वाढविणे, उत्पादित दुधाचे योग्य पद्धतीने संकलन, विपणन करून शेतक-यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी महादूध प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ४०१ गावांची निवड झाली असून, या माध्यमातून विविध उपक्रम गाव पातळीवर राबविण्यास सुरुवात झाली आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यशासन आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून मराठवाडा आणि विदर्भातील ११ जिल्ह्यात दुध उत्पादन वाढविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
महादूध प्रकल्पांतर्गत गाव पातळीवर दूध उत्पादन वाढविण्यासाठी पशुपालकांना विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. शेतक-यांना गायी, म्हशींसाठी गाव पातळीवर कृत्रिम रेतन सुविधा पुरविणे, दुध देणाºया पशुंना संतुलित आहार मिळावा यासाठी २५ टक्के अनुदानावर गुणवत्तापूर्व पशुखाद्य पुरविणे, गोचिड, गोमाशा निर्मुलन, वंध्यत्त्व निदान व उपचार शिबिरे घेणे, योग्य वेळी जनावरांना लसीकरण करणे, वैरण विकास कार्यक्रमांतर्गत बहुवार्षिक वैरण पिकांची लागवड करणे, अनुदान तत्त्वावर पूरक पशुखाद्य, कडबाकुट्टी यंत्र उपलब्ध करून देणे आदी सुविधा दुग्ध उत्पादन करणाºया पशुपालकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये पशुपालकांनी शिबिरे घेऊन त्यांना माहिती देणे, गाव पातळीवर पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, योजनेबाबत विविध पातळ्यांवर जनजागृती करणे इ. उपक्रम सध्या राबविण्यात येत आहे. महादूध प्रकल्पांतर्गत पुशपालकांना अनुदानवर देण्यात येणाºया लाभाची रक्कम थेट पशुपालकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डी. बी. कुरेवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.