मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 06:08 AM2024-11-01T06:08:20+5:302024-11-01T06:09:49+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : हे नवीन समीकरण आता निवडणुकीत उतरल्यामुळे महायुती आणि महाआघाडी दोघांचीही डोकेदुखी वाढणार आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : वडीगोद्री (जि. जालना) : मराठा, मुस्लीम, दलित (एमएमडी) मतांचे समीकरण जुळवण्यासाठी अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत मराठा, मुस्लीम, दलित समीकरणावर एकमत झाले आहे. ही विधानसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय घेण्यात आला असून कोणत्या जागा लढायच्या आणि कोणते उमेदवार द्यायचे हे ३ नोव्हेंबर रोजी ठरणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सांगितले.
हे नवीन समीकरण आता निवडणुकीत उतरल्यामुळे महायुती आणि महाआघाडी दोघांचीही डोकेदुखी वाढणार आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीनंतर जरांगे पाटील म्हणाले की, मतदारसंघात इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. आता ३ नोव्हेंबरला कोणत्या जागी कोणता उमेदवार द्यायचे हे ठरवले जाईल. एक उमेदवार निवडला जाईल. इतरांनी अर्ज मागे घेत स्टार प्रचारक म्हणून काम करायचे, असा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला आहे.
सहनशक्ती संपली, आता परिवर्तनाची वेळ
आमची सहन करण्याची क्षमता आता संपली आहे. आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे. आम्हाला अन्यायाचे संकट परतून लावायचे आहे. आम्हाला संपवायला निघालेल्यांना संपवण्याची वेळ आलेली आहे. मराठा समाजाने जे स्वप्न पाहिले हाेते, ते स्वप्न आज साकार होणार आहे. आता आमचे समीकरण पक्के झाले असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
तिनही समाज एकत्र आल्याने बदल घडेल : जरांगे
मराठा समाजाला मी एकत्र केले आहे. आता मुस्लिम आणि दलित समाजदेखील सोबत आला आहे. यामुळे समीकरण जुळले आहे. आम्ही सोबत आल्याने बदल घडेल, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला. यावेळी मुस्लिम धर्मगुरू सय्याद नोमानी, आनंदराज आंबेडकर यांची उपस्थिती होती.
उमेदवारांना पाठिंबा देणार : सज्जाद नोमानी
धर्मात फूट पाडणारे सत्तेमध्ये आहेत. त्यांनी महाराष्ट्राची राजधानी गुजरात स्थानांतरित केली आहे. संघ परिवार आणि त्यांचे एजंट धर्माचे नाव घेऊन भांडण लावत आहेत. सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. ही शरमेची बाब असल्याचे सज्जाद नोमानी यांनी सांगितले.
आम्ही विचारपूर्वक प्रत्येक मतदारसंघात मनोज जरांगे यांनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे देखील नोमानी म्हणाले.
जातनिहाय समीकरण जुळविणे सुरू : निवडणुका लढण्याचे ठरल्यामुळे आता मनोज जरांगे-पाटील यांच्या ‘एमएमडी’ फॅक्टरवर स्वार होऊ इच्छिणाऱ्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांच्या आदेशाने प्रत्येक मतदारसंघातून अनेकांनी उमेदवारी दाखल केली. आता कोणता शिल्लेदार निवडणूक रिंगणात राहणार हे ४ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. उमेदवार जातनिहाय समीकरण जुळवीत आहेत