विधानसभा निवडणुकीत लढायचं अन् पाडायचंही; मनोज जरांगे-पाटील यांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 08:46 AM2024-10-21T08:46:16+5:302024-10-21T08:46:58+5:30

जरांगे-पाटील यांचे हे तिहेरी सूत्र सत्ताधारी महायुतीसह विरोधी मविआचीही चिंता वाढविणारे ठरणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Manoj Jarange Patil said we will fight and beat others | विधानसभा निवडणुकीत लढायचं अन् पाडायचंही; मनोज जरांगे-पाटील यांचा एल्गार

विधानसभा निवडणुकीत लढायचं अन् पाडायचंही; मनोज जरांगे-पाटील यांचा एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना): ज्या ठिकाणी विजय होणार तिथे उमेदवार द्यायचा आणि जिथे उमेदवार देता येत नाही, तिथे पाडापाडी करायची, अशी भूमिका जाहीर करतानाच आरक्षित असणाऱ्या जागांवर आपल्या विचारांच्या उमेदवारांना मतदान करायचे, असे तिहेरी सूत्र मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी समाजासमोर मांडले. जरांगे-पाटील यांचे हे तिहेरी सूत्र सत्ताधारी महायुतीसह विरोधी मविआचीही चिंता वाढविणारे ठरणार आहे.

मराठा समाजातील राजकीय, सामाजिक, कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत लढायचे की पाडायचे, याचा निर्णय घेण्यासाठी रविवारी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिथे आपली ताकद आहे, अशा मतदारसंघात उमेदवार उभा करायचे. आरक्षित जागांवर आपल्या विचारांचे उमेदवार विजयी करायचे, ते करतानाही त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून घ्यायचे आणि जिथे आपली ताकद नाही तिथे पाडापाडी करायची, असा निर्णय या बैठकीत जरांगे-पाटील यांनी जाहीर केला.

कोणी अर्ज मागे घ्यायचा हे २९ तारखेला सांगू

निवडणुकीसाठी सर्वांनी अर्ज भरावेत. सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल आणि २९ तारेखला कोणी अर्ज मागे घ्यायचा हे सांगितले जाईल. ज्यांची नावे जाहीर होतील त्यांच्या मागे समाजाने राहावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले. 

मौलाना सज्जाद नौमानी यांची मध्यरात्री भेट

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी मध्यरात्री २:०० वाजता शहरातील एका हॉटेलमध्ये इस्लाम धर्माचे अभ्यासक तथा ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नौमानी यांची भेट घेतली. उभयतांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. या भेटीनंतर जरांगे-पाटील यांनी सांगितले की, मौलाना सज्जाद नौमानी हे राज्यातील धर्मगुरूंसोबत चर्चा करून निर्णय कळविणार आहेत. उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, हे त्यांचेही मत आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Manoj Jarange Patil said we will fight and beat others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.