मनोज जरांगेंनी पहाटेच्या बैठकीत 'तो' प्रश्न विचारला अन् निवडणुकीतून माघारीचा निर्णय झाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 10:50 AM2024-11-04T10:50:22+5:302024-11-04T10:50:22+5:30
मनोज जरांगे पाटलांनी अचानक माघार का घेतली, असा प्रश्न उपस्थित होत असताना याबाबत स्वत: त्यांनीच खुलासा केला आहे.
Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांकडून अद्याप यादी न आल्याने आणि एका जातीवर निवडणूक लढणं शक्य नसल्याचं सांगत जरांगे यांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र मागील काही दिवसांपासून निवडणूक लढवण्यासाठी खलबतं करणाऱ्या जरांगे पाटलांनी अचानक माघार का घेतली, असा प्रश्न उपस्थित होत असताना याबाबत स्वत: त्यांनीच खुलासा केला आहे.
"मराठा-मुस्लीम-दलित या शक्तीच्या आधारे आपण निवडणुकीला सामोरे जाणार होतो. त्यानुसार काल आपली मित्रपक्षांसोबत चर्चा झाली होती. आम्ही सायंकाळपर्यंत आमचे उमेदवार कळवतो, असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. मात्र काल रात्रीही त्यांच्याकडून उमेदवार यादी देण्यात आली नाही आणि अजूनही त्यांची यादी आली नाही. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आम्ही पहाटे ३ वाजता सगळे सहकारी एकत्रित बसलो. आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. असं असताना अजून जर मित्रपक्षांची यादीच आली नसेल तर आपण अर्ज मागे कधी घेणार? आणि मित्रपक्ष सोबत नसतील तर फक्त एका जातीच्या आधारावर निवडणूक लढवायची का? असा प्रश्न मी सर्वांना विचारला. त्यावर सगळ्यांनी नको असं सांगितलं. त्यामुळे आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत आहोत," अशी घोषणा मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
विधानसभा निवडणुकीत काय असणार जरांगेंची भूमिका?
"समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा," असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आज केलं आहे.