कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 07:02 AM2024-11-10T07:02:15+5:302024-11-10T07:02:55+5:30

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण, राजकारण, विधानसभा निवडणूक आणि आंदोलनाची पुढील दिशा यावर जरांगे पाटील यांनी ‘लोकमत’सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 maratha reservation manoj jarange patil interview | कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!

कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!

लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका बजावल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीचाही गनिमी कावा ठरला आहे. समाजाचे नुकसान होऊ नये म्हणून आपण निवडणुकीतून माघार घेतली. एकट्या समाजाच्या बळावर निवडून येणे अशक्य असते. परंतु आता कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडायचे हा निरोप त्या-त्या मतदारसंघात पोहोचला आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. अंतरवाली सराटीत ड्रॅगन फ्रूटच्या शेतात ‘लोकमत’च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांनी ही माहिती दिली.

प्रश्न: अखेरच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली?
या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी माघार नाही तर निर्णायक भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले. एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही. मराठा उमेदवार पराभूत झाले असते तर त्याचा फटका आरक्षण आंदोलनाला बसला असता. राजकारण हा माझा प्रांत नाही. मला समाजासाठी लढायचे आहे. त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला. तो मी एकट्याने घेतला नाही. मराठा समाजबांधवांशी चर्चा केली. त्यांनाही माझे म्हणणे पटले. नंतर मी हा निर्णय जाहीर केला, असे जरांगे यांनी सांगितले. 
प्रश्न: तुम्ही शब्द दिला म्हणून आजही अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. हे का घडले? 
यावर जरांगे म्हणाले, ज्यांना समाजासाठी लढायचे होते. त्यांनी माझ्या आवाहनानंतर माघार घेतली. ज्यांना समाजाची मदत घेऊन फक्त आमदार व्हायचे होते ते रिंगणात कायम आहे. मराठा समाजाने राजकारणात पडूच नये. जेवणातील लोणच्याप्रमाणे राजकारण करा. आगामी दहा-बारा दिवस हे चालू द्या. नंतर आपल्या पोरा-बाळाच्या भविष्यासाठी आंदोलनात वेळ द्या. त्यांचे भविष्य उज्ज्वल करा, असा सल्ला जरांगे पाटील यांनी मराठा समाजबांधवांना दिला.
प्रश्न: तुमच्या आंदोलनामुळे समाजा-समाजात तेढ निर्माण झाली असे वाटत नाही का?
या प्रश्नावर जरांगे म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी असा आरोप केला जातो. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. आजही आम्ही सर्वजण एकच आहोत. आमच्यात कसलेही मतभेद नाहीत. उलट जे असा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याच मागे समाज नाही. 
प्रश्न: शरद पवारांचा फोन येतो का?
१३ महिन्यांपासून मी फोन वापरणे बंद केले आहे. मग मला फोन कसा येईल? माझ्या मराठा समाजबांधवांसाठी मी माझ्या डोक्याने चालतो. कोण म्हणतो रिमोट पवारांचा, कोण म्हणतो शिंदेंचा? रिमोट माझ्याच हातात असून बदनामीसाठी सोयीने ही नावे घेतली जातात, असे जरांगे म्हणाले.
प्रश्न: ५७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र?
आंदोलनासाठी राज्यातील ५७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले. एका कुटुंबात पाच असे गृहीत धरले तर जवळपास तीन कोटी लोकांना आरक्षणाचा फायदा झाला.  रोज पाच-दहा मराठा तरुण मला नोकरी लागली असे सांगायला येतात. हे यश मराठा समाजाच्या एकजुटीचे आहे. स्वार्थासाठी या समाजाचा मी कधीच विश्वासघात करणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
प्रश्न: लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मराठा बांधवांसाठी लाखोंचा खर्च करतो कोण? 
या प्रश्नावर जरांगे म्हणाले, ‘आता वडीगोद्रीला जायचे म्हटले तर माझ्या खिशात दहा रुपये नाहीत. पैसा लागतो कशाला? कोटींच्या संख्येने समाज माझ्या पाठीशी आहे. स्वयंस्फूर्तीने ते खर्च 
करतात. मला एक रुपयासाठी कधी 
हात पसरावा लागला नाही. वर्गणी गोळा करून ते खर्च करतात आणि हाच समाज माझी ताकद आहे.’

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 maratha reservation manoj jarange patil interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.