Maharashtra Election 2019 : कार्यकर्ते जोमात तर शेतकरी पावसामुळे चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:15 PM2019-10-12T18:15:46+5:302019-10-12T18:16:52+5:30
शेतकरी मतदार मात्र पावसाच्या चिंतेने हैराण
राजूर : विधानसभा निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर आली असून, उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून शेतकरी मतदार मात्र पावसाच्या चिंतेने हैराण झाल्याचे चित्र राजूर परिसरात दिसून येत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी राजूरेश्वराला नारळ फोडून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामाला भिडवल्याने कार्यकर्त्यांनी सुध्दा मरगळ झटकून पायाला भिंगरी बांधली आहे. खेड्यापाड्यात कार्यकर्ते प्रचार करीत असले तरी शेतकऱ्यांमध्ये निवडणुकीचा ऊत्साह कमी दिसून येत आहे. राजूर हे पंचक्रोशितील गावांचे राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. कोणत्याही निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राजूरेश्वरापासून केला जातो.
यावर्षी राजूरसह परिसरात एकही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम रिमझीम पावसावर तग धरून आहे. परतीच्या पावसाने सुध्दा दगा दिल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. विहीरी, ओढे, नाले, तलाव कोरडेठाक असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची चिंता सतावत आहे.
परिसरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. संभाव्य पाणी समस्येने सामान्य नागरिकांच्या डोळ््यात पाणी येत आहे. रिमझीम पावसावर खरीपाचा हंगाम निघेल मात्र रब्बीचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अर्थिक नियोजन शेती व्यवसायावर अवलंबून राहात असल्याने त्यांना ऊदरनिवार्हाची चिंता सतावत आहे. त्यामुळे विविध पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते जोमात फिरत असले तरी शेतकरी मात्र निवडणुकीच्या काळातही चिंतेत दिसून येत आहे.