Maharashtra Election 2019 : जालना जिल्ह्यात महायुती-आघाडीत थेट लढती होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:50 PM2019-10-05T13:50:40+5:302019-10-05T13:54:36+5:30
जालन्यात गोरंट्याल-खोतकर लढतीकडे लक्ष
- संजय देशमुख
जालना : जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत यावेळी भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट सरळ लढती होतील, असे सध्याचे चित्र आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे एकत्रित लढले होते. त्यावेळी वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममची युती तुटल्याचा नेमका लाभ कोणाला मिळतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जालन्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर विरूध्द काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात परंपरागत लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी शिवसेना-भाजपची युती तुटल्याने भाजप स्वतंत्र लढले होते. त्यात बसपाकडून अब्दुल रशीद पहेलवान यांनी जवळपास ३७ हजार मते मिळवली होती. त्याचा मोठा फटका गोरंट्याल यांना बसला होता. यंदा शिवसेना -भाजपची युती आहे.
जालना शहरातील मतदारांवरच या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील. गोरंट्याल यांच्या ताब्यात जालना पालिकेची सूत्रे असल्याने त्यांना जालन्यातून मोठी आशा आहे. जालन्यातून एमआयएमने माजी नगराध्यक्ष इक्बाल पाशा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना मिळणाऱ्या मतांवरच गोरंट्याल यांचे भवितव्य अवंलबून राहील. घनसावंगी मतदारसंघात गेल्यावेळी तेथे शिवसेनेकडून डॉ. हिकमत उढाण, भाजपकडून माजी आ. विलास खरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. राजेश टोपे यांच्यात लढत होती. ती यंदा उढाण आणि टोपे यांच्यात होणार आहे. वंचित आघाडीचे उमेदवार शेळके हे आहेत.
परतूर मतदारसंघातही परंपरागत लढत अपेक्षित असून, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरूध्द काँग्रेसचे माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्यात चुरस आहे. भोकरदन विधानसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा आ. संतोष दानवे यांच्याविरूध्द या मतदारसंघाचे राष्ट्रवादीकडून तीनवेळा नेतृत्व केलेले माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यात सामना होणार आहे.
प्रमुख पक्षाच्या विरोधात अर्ज नाही
जालन्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कुठल्याच बड्या राजकीय पक्षातील उमेदवारांनी जाहीर झालेल्या उमेदवाराविरूध्द उमेदवारी दाखल केलेली नाही. बदनापूर मतदारसंघातून सेनेचे माजी आ. संतोष सांबेर हे उमेदवारी अर्ज भरणार होते; परंतु नंतर मातोश्रीवरून त्यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांनी निर्णय बदलला.