Maharashtra Election 2019 : वॉटर ग्रीडमुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल - नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 04:14 PM2019-10-16T16:14:48+5:302019-10-16T16:17:37+5:30
मराठवाड्याने राज्याला तीन मुख्यमंत्री दिले मात्र, मराठवाड्याचा अपेक्षित विकास झाला नाही.
जालना : मराठवाडा विकासासाठी मंजूर झालेला निधी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन सरकारमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लाटला. त्यामुळे मराठवाड्याचा विकास आवश्यक त्या प्रमाणात झाला नाही. केंद्र आणि राज्य शासनाने वेगवेगळ्या योजना राबवून दुष्काळ मुक्तीला महत्त्व दिले आहे. वॉटर ग्रीड योजनेमुळे आगामी काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊन सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी कलम ३७०, तिहेरी तलाक, बालाकोट एअरस्ट्राईक आदी मुदद्यांवरून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ परतूर येथे बुधवारी दुपारी आयोजित सभेत मोदी बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. बबनराव लोणीकर, आ. अर्जुन खोतकर, हिकमत उढाण, खा. संजय जाधव, आ. मोहन फड, मेघना बोर्डीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. बबनराव लोणीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
मराठवाड्याने राज्याला तीन मुख्यमंत्री दिले मात्र, मराठवाड्याचा अपेक्षित विकास झाला नाही. मागील पाच वर्षाच्या कालावधीत सरकारने विविध योजना राबवून मराठवाड्याचा विकास केला आहे. जलयुक्त शिवार ही योजना क्रांतीकारक ठरली आहे. कर्जमाफी, भारनियमनमुक्त गावांसाठी प्रयत्न झाले. जालना येथील ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडस्पार्क, औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहत झोन, कौशल्य विकास योजना याबाबींमुळे मराठवाड्याचा विकास होणार आहे. दुष्काळ मुक्तीसाठी वॉटर ग्रीड महत्त्वकांक्षी योजना लाभदायक ठरणार आहे. आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना दुष्काळ जवळून पाहिला आहे. दुष्काळामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊन नागरिकांचे स्थलांतर होते. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाने जलसंवर्धनाला महत्त्व दिले असून, त्यासाठी साडेतीन लाख कोटी रूपये निधीची तरतूद केली आहे. शासनाने अल्पसंख्यांक पेन्शन योजना, आयुषमान भारत, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, शेतकरी पेन्शन, घरकूल आदी अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढविताना तिहेरी तलाक, कलम ३७०, बालाकोट आदी मुदद्यांवर त्यांनी विरोध केला. त्यांची देशभक्ती केवळ त्यांच्या परिवार भक्तीत होती. आता मात्र ते पक्षीय कार्यक्रमात कार्यकर्त्यांना राष्ट्रवादाचे धडे देऊ लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीचे सरकार येणार असल्याचे संकेत दिले होते. विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे उमेदवार विजयी होणार आहेत. विकास कामे होण्यासाठी केंद्र आणि राज्यात एका विचाराचे सरकार हावे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन मोदी यांनी केले.
बंजारा समाजाचे प्रश्न सोडविणार
परतूर विधानसभा मतदार संघात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. याची दखल घेत नरेंद्र मोदी यांनी बंजारा समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत समाजाला आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविणार असल्याचे सांगितले.