डिजिटल स्कोअरबोर्डसह चार आखाड्यावर होणारी पहिलीच महाराष्ट्र केसरी : बाळासाहेब लांडगे
By जयंत कुलकर्णी | Published: December 20, 2018 04:36 PM2018-12-20T16:36:01+5:302018-12-20T16:58:54+5:30
मराठवाड्यात चार आखाड्यावर होणारी ही पहिलीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे
- जयंत कुलकर्णी
जालना : येथील आझाद मैदानावर सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत डिजीटल स्कोअरबोर्ड वापरला जात आहे. असा बोर्ड वापरण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ असून मराठवाड्यात चार आखाड्यावर होणारी ही पहिलीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद जालन्याला देण्यापाठीमागचा उद्देश त्यांनी सांगितला. ते म्हणाले, ‘‘राज्य व राष्ट्रीय पातळीवर मल्ल घडावे, कुस्तीचा प्रसार व्हावा या उद्देशाने प्रत्येक वर्षी विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरीचे आयोजन केले जाते. या वेळी दयानंद भक्त यांच्या मागणीमुळे जालना येथे ही स्पर्धा देण्यात आली आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष अर्जुनराव खोतकर व दयानंद भक्त यांनी या स्पर्धेसाठी चांगले नियोजन केले आहे.’’
प्रथमच चार आखड्यावर महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चार आखाड्यावर होण्याची ही मराठवाड्यातील पहिली आणि महाराष्ट्रातील दुसरी वेळ आहे. या आधी पुणे जिल्ह्यातील भूगाव येथे चार आखाड्यावर ही कुस्ती स्पर्धा घेण्यात आली आहे. जालना येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत डिजीटल स्कोअरबोर्ड वापरला जात आहे. असा बोर्ड वापरण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. तसेच या कुस्ती स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपणही यू ट्यूबवर केले जाण्याचीदेखील पहिलीच वेळ आहे, अशी माहितीही बाळासाहेब लांडगे यांनी दिली.
मल्लांना आर्थिक मदत
महाराष्ट्रातील पदकविजेत्या व दिग्गज पहिलवानांसाठी शासनाच्या मदतीने पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता राहुल आवारे याची आॅलिम्पिकच्या दृष्टीने तयारी सुरु आहे. त्याच्यासह दहा पहिलवानांना राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आर्थिक साह्य करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
बदनाम करण्याचा कट
राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान काही मल्लांना रेल्वेच्या शौचलयाजवळ बसून प्रवास करावा लागला होता व त्यांची गैरसोय झाली होती. याविषयी बाळासाहेब लांडगे म्हणाले, '' आम्हाला भारतीय कुस्ती महासंघाचे पत्र उशीरा आले. तरीही तात्काळ मल्लांच्या तिकिटांचे रिझर्व्हेशन करण्यात आले होते. रेल्वेवर काही कोणाची मक्तेदारी नाही. काही जणांची तिकिट कन्फर्म झाले नाही आणि या मोजक्याच जणांनी बदनाम करण्याचा हा कट रचला होता. आता आम्ही कुस्ती महासंघाला स्पर्धेविषयीचे सर्क्युलर दोन महिने आधी पाठवण्याची विनंती केली आहे जेणे करुन पहिलवानांचे स्पर्धेसाठी रिझर्व्हेशन करणे सोपे होईल.’’