अभिजीत, शेखमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी किताबाची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:28 AM2018-12-23T01:28:45+5:302018-12-23T01:28:51+5:30
पुण्याच्या अभिजीत कटके याने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली
जयंत कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुण्याच्या अभिजीत कटके याने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. गत वर्षी भूगाव येथे चॅम्पियन ठरणाºया अभिजीत कटके याने महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकले. आता प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके हा बुलढाणा येथील बालारफिक शेख याच्याशी दोन हात करणार आहे.
जालना : महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी विभागातील पहिली उपांत्य फेरीची लढत नाशिकचा हर्षद सदगीर आणि जळगावचा अतुल पाटील हे दोघेही अनुपस्थित राहिले. त्यामुळे अभिजीत कटके व रवींद्र शेडगे यांच्यातील उपांत्य फेरीला महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी विभागाच्या फायनलच्या रुपात झाले. त्यात अभिजीत कटके याने सोलापूरच्या रवींद्र शेडगे याचा पराभव करीत सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावण्याकडे वाटचाल सुरु केली. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाºया अभिजीत कटके याने खप्पा डाव मारताना रवींद्रविरुद्ध दोन गुण वसूल केले. त्यानंतर अभिजीतने ढाक डावावर रवींद्र शेडगे याला चीत करीत फायनलमध्ये प्रवेश मिळवला.
महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या माती विभागातील अंतिम सामन्यात बुलढाणाच्या बाला रफिक शेख व रत्नागिरीचा संतोष दोरवड यांच्यात रंगली. संतोषने ढाक मारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा हा डाव रफिकने त्याच्यावरच उलटवताना २ गुण वसूल केले. त्यानंतर बाला रफिकने एकेरी पट काढत प्रतिस्पर्ध्याला मैदानाबाहेर ढकलत आणखी एका गुणाची कमाई केली व गदालोड डावावर संतोषला चीत करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. तत्पूर्वी, महाराष्ट्र केसरी वजनाच्या माती विभागातील उपांत्य फेरीत बुलढाण्याच्या बालारफिक शेख याने पुण्याच्या साईनाथ रानवडे याचा ६-३ गुणाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती तर संतोष दोरवड याने सेमीफायनलमध्ये धडक मारलेल्या यजमान जालन्याच्या विलास डोईफोेडे याला चीत करीत अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केली. बालारफिक शेखने प्रतिस्पर्ध्याला दोनदा बाहेर टाकत आणि नंतर एकेरी पट काढताना प्रतिस्पर्ध्यावर ६-३ अशी आघाडी घेतली. दुस-या उपांत्य फेरीत सांगलीच्या संतोष दोरवड याने लपेट डावावर २ गुण घेत आघाडी घेतली आणि त्यानंतर ७-0 अशी आघाडी वाढवली व नंतर प्रतिस्पर्ध्याला चीत केले. तत्पूर्वी, पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवड याने नगरच्या योगेश पवार याचा पराभव केला होता तर जालना येथील विलास डोईफोडे याने कोल्हापूरच्या संतोष लवटे याचा पराभव केला होता.