महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : जालन्यात पहिलवानांची मिरवणूक काढून जोरदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 06:25 PM2018-12-20T18:25:46+5:302018-12-20T18:28:39+5:30
पाहिलवांनासह कुस्ती प्रेमी जालनेकरांनी जय बजरंगच्या जयघोषाने अवघे शहर दणाणून सोडले होते.
जालना : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे व जिल्हा तालीम संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने गुरुवारी पहिलवानांची शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. पाहिलवांनासह कुस्ती प्रेमी जालनेकरांनी जय बजरंगच्या जयघोषाने अवघे शहर दणाणून सोडले होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याहस्ते या मोटरसायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. मोटरसायकलच्या मागे ट्रॅक्टरांमध्ये पहिलवानांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अर्जुन खोतकर, प्रा.डॉ. दयानंद भक्त, कार्याध्यक्ष संजय खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, युवा नेते अभिमन्यू खोतकर, शहरप्रमुख प्रा. डॉ. आत्मानंद भक्त, विष्णू पाचफुले, भाऊसाहेब घुगे, पांडुरंग डोंगरे हे मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी ढोलताशे आणि हलगीच्या तालावर पहिलवांनासह कुस्तीप्रेमी जालनेकरांनी जय बजरंगच्या जयघोषाने अवघे शहर दणाणून सोडले होते. पहिलवानांना पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
शहरातील आझाद मैदान येथून सुरू झालेली ही रॅली शिवाजी पुतळा, सराफा मार्केट, फुल बाजार, सिंधी बाजार, मामा चौक, महावीर चौक, सुभाष चौक, लोखंडी पुल, मंमादेवी मंदीर, गांधी चमन मार्गे संभाजी उद्यान येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत राज्यासह देशभरातील अनेक नामवंत मल्ल, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक आदींसह कुस्तीप्रेमी तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.