महात्मा गांधींनीही स्वीकारले बाबासाहेबांचे विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:56 AM2019-04-14T00:56:30+5:302019-04-14T00:57:29+5:30
कायम विरोधाची भूमिका घेणाऱ्या गांधींमध्येही आंबेडकरांच्या विद्रोही भूमिकेने परिवर्तन आणले, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील डॉ. संभाजी बिरांजे यांनी येथे बोलतांना केले.
जालना : जमेल त्या मार्गाने महात्मा गांधींनीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. कधी- कधी समोरासमोर केलेल्या विरोधालाही बाबासाहेब भीक घालत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर महात्मा गांधींनी गनिमी काव्या सारखा देखील विरोध केला.
येरवडा कारागृहातील उपोषणानंतर मात्र, महात्मा गांधींमध्ये प्रचंड परिवर्तन झाले. प्रत्येक ठिकाणी गांधींना आंबेडकरांशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते की सुचत नव्हते. त्याचे कारण असे की, बाबासाहेबांमधील शक्तीची परिपूर्ण कल्पना गांधींना आली होती. म्हणूनच कायम विरोधाची भूमिका घेणाऱ्या गांधींमध्येही आंबेडकरांच्या विद्रोही भूमिकेने परिवर्तन आणले, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील डॉ. संभाजी बिरांजे यांनी येथे बोलतांना केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील भारतीय समाज व्यवस्थेला विद्रोहाचे तत्त्वज्ञान देणारे डॉ. आंबेडकर या विषयावर चौथे गुंफताना डॉ. बिरांजे बोलत होते. यावेळी विचारपीठावर अॅड. कैलास रत्नपारखे, प्राचार्य राजकुमार म्हस्के, महेंद्र रत्नपारखे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. बिरांजे म्हणाले की, आंबेडकर आणि गांधी यांच्यात झालेला टकराव एक ऐतिहासिक होता. १९३० ते ३२ च्या गोलमेज परिषदेच्या सुरुवातीला त्याचा प्रारंभ झाला. यातूनच गांधी आणि आंबेडकरांमध्ये वैचारिक वाद झाला. यावर आंबेडकरांनी दोन पावले मागे घेतले. दलितांसाठी राखीव जागा घेऊन औपचारिकता साध्य केली. आंबेडकरांनी वेगळ्या मतदार संघाची मागणी केली पण निरर्थकपणे. पुणे करार वैशिष्ट्यपूर्ण ठरला आणि गांधीजींनी आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांना अस्पृश्यांतील सर्वात शक्तिशाली शत्रूंपैकी एक म्हणून पाहिले. आंबेडकरांनी केलेल्या तडजोडीनंतर गांधीजींनी हरिजन सेवक संघ बोलायला सुरुवात केली. येथे पुन्हा महत्त्वपूर्ण फरक उद्भवला. आंबेडकरांनी व्यापक नागरी हक्क संघटनांसाठी युक्तिवाद केला जो दलित लोकांच्या नागरी हक्क मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरल्याचे बिरांजे यांनी सांगितले.