निधीअभावी महात्मा गांधी अध्ययन केंद्राला घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:57 AM2018-10-02T00:57:09+5:302018-10-02T00:57:49+5:30
जेईएस महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या आणि अल्पवधीच संपूर्ण राज्यात नावाजलेल्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राला गेल्या तीन वर्षापासून निधी मिळत नसल्याने हे केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील जेईएस महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू झालेल्या आणि अल्पवधीच संपूर्ण राज्यात नावाजलेल्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राला गेल्या तीन वर्षापासून निधी मिळत नसल्याने हे केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. सद्य:स्थितीत जेईएस महाविद्यालयाचे व्यवस्थापन खिशातून पैसे खर्च करून केंद्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु हे किती दिवस चालणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. म.गांधींच्या विचारांचा प्रसार अडचणीत आला आहे.
देशातील विविध थोर विचारवंताचे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने ही अध्ययन केंद्र स्थापन केली होती. त्यात जालन्यात महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जेईएस महाविद्यालयाने हे केंद्र सुरू केले होते. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १४ राज्यस्तीय युवक-युवतींचे शिबिरांचे आयोजन केले होते. प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह अनेक दिग्गज विचारवंतांनी जालन्यात हजेरी लावून युवकांना मार्गदर्शन केले होते. दरम्यान महात्मा गांधीचे विचार हे विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी या केंद्राकडून एक स्वतंत्र परीक्षा घेतली जात होती. ही परीक्षा जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी दिली आहे. एकूणच मोठी ग्रंथ संपदा असलेले वाचनालय या केंद्रात आहे. या केंद्राच्या माध्यमातून गावाकडे चला या अंतर्गत सेद्रिंय शेती तसेच विशेष स्वच्छता अभियान राबविले आहे. या केंद्राला २००६ पासून दरवर्षी सात लाख रूपयांचा निधी मिळत होता. तो आता तीनवर्षापासून बंद झाला आहे. एकीकडे महात्मा गांधीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचे दाखवत असले तरी वास्तव मात्र, वेगळेच आहे. या केंद्राला निधी देण्याचा मुद्दा हा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे जेईएस महाविद्यालच्या हिरक महोत्सची कार्यक्रमाच्या शुभारंभास आले असता, त्यांच्याही लक्षात आणून देण्यात आला होता. मात्र त्यांनीही याकडे ऐकून न एैकल्या सारखे केल्याचे दिसून येते. सर्वात मोठे दर्दैव म्हणजे हे केंद्र नेमके महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती वर्षात आर्थिक कोंडीत सापडले आहे. हे केंद्र भविष्यात आणखी चांगले उपक्रम राबवू शकते. परंतू, केंद्र चालविण्यासाठी निधीची नितांत गरज आहे.