महात्मा गांधींचा विचार मानवी जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:57 AM2021-02-06T04:57:00+5:302021-02-06T04:57:00+5:30
फोटो जालना- महात्मा गांधींचा विचार जीवनाला दिशा दर्शक आहे. मानवी जीवन सार्थक करणारा विचार आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी ...
फोटो
जालना- महात्मा गांधींचा विचार जीवनाला दिशा दर्शक आहे. मानवी जीवन सार्थक करणारा विचार आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश रेणूप्रसाद पारवेकर यांनी केले.
येथील जेईएस महाविद्यालयाचे महात्मा गांधी अध्ययन केंद्र, मुंबई सर्वोदय मंडळ ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा कारागृह यांच्या वतीने कारागृहातील बंद्यांसाठी घेण्यात येणाऱ्या गांधी शांती परीक्षेसाठी शुक्रवारी पुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी पारवेकर बोलत होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव, महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.यशवंत सोनुने यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना न्यायाधीश पारवेकर म्हणाले की, महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने घेण्यात येणारी गांधी शांती परीक्षा ही महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आहे. या परीक्षेतून महात्मा गांधींचा सत्य, अहिंसा, चारित्र्य आदी विचार आपण आचरणात आणला तर आपले जीवन सार्थक होऊ शकते. याप्रसंगी बोलताना कारागृह अधीक्षक मुगुटराव म्हणाल्या की, महात्मा गांधींचा विचार मानवी जीवन समृद्ध करणारा आहे. जीवनात एकदा केलेली चूक परत न करणे. जीवन जगताना नेहमी सत्य, सदाचार आणि मानवी मूल्य जतन केले तर समाजातील गुन्हेगारी नष्ट होऊ शकते. महात्मा गांधींचा हा विचार समजून घेण्यासाठी या परीक्षेचे आयोजन जिल्हा कारागृहात केले जाते, असेही त्या यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. यशवंत सोनुने यांनी केले. ते म्हणाले की, महात्मा गांधी अध्ययन केंद्र आणि मुंबई सर्वोदय मंडळाच्या सहकार्याने मागील पाच वर्षांपासून या परीक्षेचे आयोजन जालना कारागृहात केले जाते. याला खूप चांगला प्रतिसाद बंदी बांधवांकडून मिळतो आहे, असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी बंद्यांना गांधी बापू, माझी जीवन कथा, संक्षिप्त आत्मकथा या पुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तुरुंग अधिकारी असद मोमीन, तुरुंगाधिकारी उन्हाळे, अधीक्षक असद खान, गोविंद कुलकर्णी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.व्ही.बी.उगले यांनी तर डॉ. एम. जी.हिंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.