भोकरदनमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यावर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 08:08 PM2024-11-14T20:08:17+5:302024-11-14T20:09:10+5:30

या प्रकरणात भाजपाच्या सात कार्यकर्त्यांविरोधात भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahavikas Aghadi candidate Chandrakant Danave's convoy stone pelted in Bhokardan | भोकरदनमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यावर दगडफेक

भोकरदनमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यावर दगडफेक

भोकरदन (जि.जालना) : महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे व कार्यकर्ते बुधवारी रात्री दगडवाडी येथील प्रचार सभा आटोपून निघाले असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक केली. यात गाडीची काच फुटून दोघे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणात गुरुवारी भाजपाच्या सात कार्यकर्त्यांविरोधात भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात राजेंद्र दसपुते यांनी तक्रार दिली आहे. बुधवारी रात्री महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्यासोबत ते दगडवाडी येथे प्रचारासाठी गेले होते. दगडवाडी गावातील सभा संपल्यानंतर दानवे व त्यांच्या सहकाऱ्यांचा ताफा भोकरदन येथील सभेसाठी निघाला. त्यावेळी जुन्या जिल्हा परिषद शाळेजवळ भाजपाचे नंदकुमार लक्ष्मण गिर्हे, सुनील लक्ष्मण गिर्हे, राजू माधवराव पांडे, सोनाजी उर्फ विष्णू माधवराव पांडे, पंढरीनाथ शिवाजी पांडे, अनिल संपत पांडे, भागवत परशराम पांडे यांनी भाजपा उमेदवार संतोष दानवे व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाने घोषणाबाजी करीत वाहनांवर दगडफेक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दगडफेकीत शंकर बुजाडे यांच्या वाहनाच्या (क्र.एम.एच.२०- बी.वाय.०८३९) काचा फुटल्या व नवनाथ दौंड यांच्या जीपवरही दगडफेक झाली. यात राजेंद्र दसपुते, रामकिसन सपाटे (रा.भोकरदन) हे किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर चंद्रकांत दानवे यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर गुरुवारी भाजपच्या सात कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारणामुळे घडला प्रकार
रावसाहेब दानवे यांनी कन्या माजी जिल्हा परिषद सदस्य आशा पांडे यांचे हे दगडवाडी गाव आहे. या गावात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांची कॉर्नर सभा झाली. त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नवनाथ दौंड यांनी आशा पांडे यांच्याबद्दल या गावाला लाभलेली ही अपशकुनी सून असे म्हणत इतर अपशब्द वापरले होते. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले व त्यांनी नवनाथ दौंड यांची गाडी अडवून जाब विचारला होता. यावेळी गावातील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर भिडले होते. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

Web Title: Mahavikas Aghadi candidate Chandrakant Danave's convoy stone pelted in Bhokardan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.