लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कमकुवत उमेदवार दिले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
By विजय मुंडे | Published: May 4, 2024 07:08 PM2024-05-04T19:08:43+5:302024-05-04T19:09:56+5:30
ठाकरे यांनी कल्याणला एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या विरोधात दिलेला उमेदवार लढू शकत नाही.
जालना : लाेकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने कमकुवत उमेदवार दिल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे केला.
वंचित बहुजन आघाडीचे जालना मतदारसंघातील उमेदवार प्रभाकर बकले यांच्या प्रचारार्थ शनिवारी सकाळी अंबड येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांनी जे लढू शकत नाहीत, असे उमेदवार दिले आहेत. ठाकरे यांनी कल्याणला एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या विरोधात दिलेला उमेदवार लढू शकत नाही. तुमच्याकडे चांगला कार्यकर्ता नव्हता का, असा सवाल आंबेडकर यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक क्लीप आली आहे. त्यात ते म्हणतात की, उद्धव ठाकरे यांना काहीही मदत पाहिजे असेल तर मी मोठा भाऊ म्हणून त्यांना द्यायला तयार आहे. हे कुठले कौतुक आहे. आपण लोकसभेत जिंकून आलो तर आपली दोघांची दोस्ती कायम, असा त्यांचा सर्व फसवणुकीचा भाग आहे. त्यांच्या मनात निवडणुकीत निवडून यायचे आणि नंतर मोदीच्या सरकारमध्ये सामील व्हायचे, असा घाट होता. तो वंचितने मोडून काढल्याचे आंबेडकर म्हणाले.
नात्यागोत्यातील लोक सत्तेत
तुम्ही जातीच्या बाहेर मतदान केले नाही. नात्यागोत्यातील लोकांना सत्तेत बसविले आहे. डावे असो किंवा उजवे असो सत्ता त्यांच्या घरात राहते. त्यामुळे तुमचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे हे बंद करा, असा सल्लाही ॲड. आंबेडकर यांनी मतदारांना दिला.