पाच पंचायत समितीत महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 01:31 AM2019-12-12T01:31:34+5:302019-12-12T01:31:38+5:30
जालना जिल्ह्यातील आठ पैकी पाच पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील आठ पैकी पाच पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यात आठ पैकी पाच पंचायत समितीचे सभापती पद हे महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीत महिला राज येणार हे निश्चित झाले आहे.
सकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. आपल्या तालुक्यासाठी कुठली सोडत सुटते, हे ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी ही सोडत काढल्यावर त्यात जालना अनुसूचित जाती महिला, परतूर नागरिकांचा मागासवर्ग महिला, जाफराबाद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, बदनापूर, भोकरदन आणि मंठा येथील पंचायत समितीच्या सभापतीसाठी सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवले असल्याचे पुढे आले.
अंबड आणि घनसावंगी येथील पंचायत समितीचे सभापतीचे आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी सुटले आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर आता लवकरच या नवीन सोडती प्रमाणे पंचायत समितीच्या सभापतीसाठीची निवड प्रक्रिया होणार आहे. सभापती म्हणून कोणाची वर्णी लागते, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. सभापती पदावर वर्णी लागावी म्हणून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्याने आधी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नंतर या सभापतींना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना मतदार करता येणार आहे.
त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतीसाठी रस्सीखेच राहणार यात शंका नाही. त्यातच बहुतांश पंचायत समिती या भाजप आणि शिवसेनेच्या ताब्यात होत्या. केवळ अपवाद ही घनसावंगी तालुक्यातील देता येणार आहे. परंतु आता नवीन राजकीय समीकरणानुसार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे राज्य सरकारमध्ये महाविकास आघाडी करून एकत्रित आले आहेत. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरील राजकीय नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे. इच्छुकांनी आपापल्या पध्दतीने वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
जालना जिल्हा परिषदेत आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षासाठी निवड होणार आहे. त्यात अध्यक्षपद हे राखीव प्रवर्गातील सुटले आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान जिल्हा परिदेच्या राजकारणात विद्यमान अध्यक्ष अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष सतीश टोपे यांचे वर्चस्व राहिले आहे.
त्यामुळे आता उपाध्यक्षपदासाठी देखील या दोघांमधूनच वर्णी लागणार असल्याच काँग्रेस तसेच अन्य काही जिल्हा परिषद सदस्य हे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे भाजप देखील ही महत्वाची जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली असल्याचे बोलले जात आहे.