अण्णांचे निधन; चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:58 AM2019-04-16T00:58:30+5:302019-04-16T00:58:50+5:30
अॅड. मधुकर अण्णा गोसावी (८०) यांचे सोमवारी पहाटे अण्णांचे यकृताच्या आजाराने निधन झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : संत साहित्याचे अभ्यासक, वारकरी संप्रदायाचे पाईक, दांडगा लोकसंपर्क व लोकसंग्रह असलेला समाजसेवी व सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी आयुष्याचा यज्ञ रचून सर्वस्वाची आहुती समर्पित करणारे अॅड. मधुकर अण्णा गोसावी (८०) यांचे सोमवारी पहाटे अण्णांचे यकृताच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा.
मधुकर अण्णा गोसावी यांचा जन्म ६ आॅक्टोबर १९३८ रोजी अंबड येथे झाला. बीएस्सी. एल. एल. बी. पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या अण्णा यांनी आपला वकिली व्यवसाय सांभाळून संघकार्यात आपला महत्वाचा वाटा उचलला. तालुका संघचालक ते देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक असा यशाचा प्रदीर्घ प्रवास करत असताना अण्णांनी संघकार्यातील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या लीलया पेलल्या. १९६७ साली अंबड नगरपालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक म्हणून पालिकेच्या सभागृहात प्रवेश केला. अण्णा हे डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे विश्वस्त होते. जांब समर्थ येथील रामदास स्वामींसह अन्य महान संतांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या निधनाने अंबड शहर एका थोर व्यक्तीला मुकले आहे.
सद्गुरु अच्युताश्रम स्वामींची अभंग गाथा, सद्गुरु अच्युताश्रम स्वामींचे चरित्र (लीलामृत), श्री गंगाधर स्वामींचे चरित्र ( तेजोनिधी श्रेष्ठ), यादव स्वामींचे चरित्र, मत्स्योदरी देवी (अंबड) महात्म्य, आबामाऊलींचे चरित्र व आठवणी ( कल्पवृक्ष), भारतीय राज्यघटना (हिंदु ह्रदय) चा अनुवाद, आनंदी स्वामी जालना, समर्थ रामदास स्वामी यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामी, समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठी आदींची ओवीबध्द चरित्रे त्यांनी लिहिली आहेत. अण्णांनी मत्स्योदरी देवी अंबडचा इतिहास लेखनही केले आहे.