मुख्य रस्त्याची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:41 AM2019-08-14T00:41:48+5:302019-08-14T00:42:02+5:30
शहरातील मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळणी झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : शहरातील मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळणी झाली आहे. यात गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या रिमझिम पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र, या रस्त्यांचे काम मंजूर झाले असे सांगूण एक वर्षांपासून वेळ मारून नेत आहे. तसेच रस्ता मंजूर झाला म्हणून तो अनेक ठिकाणी खोदून ठेवण्यात आला आहे. यापूर्वी रस्त्याचे दोनदा मोजमाप करून अतिक्रमण काढण्यात आले आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकारी- पदाधिकाऱ्यांनी कामाला अद्याप प्रत्यक्षात सुरूवात केलेली दिसून येत नाही.
पावसाळा सुरू होवून दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप येथे समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या रिपरिप पावसाने रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला आहे. विशेष म्हणजे गल्लीबोळांमधील रस्तेही बेहाल झाले आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहने चालवितांना कसरत करावी लागत आहे. याकडे सा. बां. विभागाने लक्ष देवून तातडीने रस्त्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.