जालन्यात गुटखा तस्करांवर मोठी कारवाई; ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
By विजय मुंडे | Published: August 13, 2024 05:39 PM2024-08-13T17:39:31+5:302024-08-13T17:40:06+5:30
एलसीबीची कारवाई : ५० लाख रुपयांचा गुटखा आणि २० लाख रुपये किमतीचा ट्रकही घेतला ताब्यात
जालना : एलसीबीने केलेल्या कारवाईत ५० लाख ८२ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुटख्याची वाहतूक करणारा २० लाखांचा ट्रकही ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी रात्रीच्या सुमारास जालना - अंबड मार्गावरील लालवाडी शिवारात करण्यात आली.
बीडहून जालन्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती पो.नि. पंकज जाधव यांना मिळाली हाेती. त्या माहितीवरून पथकाने सोमवारी रात्री जालना - बीड महामार्गावरील लालवाडी शिवारातील जगदंबा राजस्थानी हॉटेलसमोर संबंधित ट्रक (क्र. एमएच १५ - सीके ०१९१) थांबविला. ट्रकची पाहणी केली असता आतमध्ये ५० लाख ८२ हजर रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी चालक राजेंद्र भानुदास चव्हाण (वय ३५, रा. सुऱ्याची वाडी, ता. जि. बीड) याच्यासह ७० लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि. पंकज जाधव, स.पो.नि. योगेश उबाळे, पो.उप.नि. राजेंद्र वाघ, अंमलदार लक्ष्मीकांत आढेप, गोपाल गोशीक, देवीदास भोजणे, सचिन राऊत, भागवत खरात, सोपान क्षीरसागर, कैलास चेके यांच्या पथकाने केली.