वाळू माफियांवर मोठी कारवाई; महसूल पथकावर दगडफेक करणाऱ्या ६० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 06:39 PM2022-01-12T18:39:28+5:302022-01-12T18:41:22+5:30
महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत वाहनावर वाळू माफियांनी केली दगडफेक
भोकरदन ( जालना ) : अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांना पकडण्यास गेलेल्या तहसीलच्या पथकावर दगडफेक करणाऱ्या वालसा खालसा येथील 60 जणांविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील वालसा-खालसा येथील पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात येत असल्याची तक्रार 11 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान काही नागरिकांनी तहसीलदार सारिका कदम यांच्याकडे केली होती. यावरून कदम यांनी तलाठी बी एम सोनवणे, तलाठी शाहूंराज कदम, गणेश वाघमारे यांना वालसा खालसा येथे जाण्यास सांगितले. मात्र, पथक जाईपर्यंत नदी पात्रातील टॅक्टर व वाहने पळून गेली. पथक पोहचले असता वालसा खालसा येथे मंदिराजवळ जमलेल्या नागरिकांनी वाळू माफिया गेल्यास तुम्ही आल्याचे सांगितले. यावरून पथकातील कर्मचारी व या नागरिकांत वाद झाला.
वाद चिघळत गेल्यानंतर अचानक माफिया व नागरिकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना वाहनातून खाली ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणेश वाघमारे यांनी गाडीचे दरवाजे लावले. त्यांनी तेथून गाडी काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी अंधारातून काही जणांनी गाडीवर ( एम एच 21 बी 1277 ) दगडफेक केली. दगडफेकीत गाडीचे नुकसान होऊन कोतवाल गणेश वाघमारे जखमी झाले. यानंतर तहसीलदार सारिका कदम व पथकातील तलाठी शाहूंराज कदम यांनी आज सकाळी भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पुढील तपास सपोनि रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कचरू दाभाडे हे तपास करीत आहेत.
गय केली जाणार नाही
काही वाळू माफियांनी वाहने पकडता येऊ नये म्हणून पथकाच्या वाहनावर दगडफेक केली. पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार सहन केला जाणार नसून कोणाची ही गय केली जाणार नाही.
- सारिका कदम, तहसीलदार