मुलांना गणिताची गोडी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:39 AM2018-01-28T00:39:28+5:302018-01-28T00:39:49+5:30

विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकविण्यात येणा-या अन्य विषयांबरोबरच गणित विषय महत्त्वाचा घटक असल्याचे प्रपिादन राज्याचे शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.

Make the kids intrested in maths | मुलांना गणिताची गोडी लावा

मुलांना गणिताची गोडी लावा

googlenewsNext

जालना : शैक्षणिक सर्वेक्षणानुसार गणित विषयाच्या ज्ञानात राज्यातील विद्यार्थी एकविसाव्या क्रमांकावर आहेत. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकविण्यात येणा-या अन्य विषयांबरोबरच गणित विषय महत्त्वाचा घटक असल्याचे प्रपिादन राज्याचे शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.
येथील मातोश्री लॉन्स येथे शनिवारी जिल्हास्तरीय शिक्षक सुसंवाद कार्यशाळेत शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, संचालक कांबळे, उपसंचालक वैजिनाथ खंडळे, शिक्षणाधिकारी शाम मकरमपुरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी पी .एल. कवाणे, माध्यमिकचे एम.के. देशमुख, कैलास दातखिल, नूतन मघाडे, डॉ. सारुक, डॉ. प्रकाश माटे, स्मिता कापसे, रवी जोशी आदींची उपस्थिती होती.
नंदकुमार म्हणाले की, लहान वयातच विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने शिक्षण मिळायला हवे. समाजातील प्रत्येक मुला-मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे. शाळांमध्ये मुला-मुलींना शिक्षण देत असताना विविध संकल्पना राबविण्यात याव्यात. शैक्षणिक सर्वेक्षणानुसार भाषा विषयाच्या ज्ञानात राज्यातील विद्यार्थी आठव्या तर गणित विषयाच्या ज्ञानात एकविसाव्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकविण्यात येणा-या अन्य विषयांबरोबरच गणित विषय महत्त्वाचा घटक आहे. केवळ व्यवहारामध्ये किंवा केवळ गणना करण्यासाठी गणिताचा उपयोग होत नाही. जीवनात तर्कशुद्ध विचार गणित विषयामुळे प्राप्त होतात. त्यामुळे शिक्षण विभाग व शिक्षकांनी केवळ परिस्थितीला दोष न देता ती सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. आधुनिकतेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याला आपले भविष्य उज्ज्वल घडवता यावे यासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञानही मिळायला हवे.
सुनील मावकर यांनी सूत्रसंचालन केले तर एम. देशमुख यांनी आभार मानले. कार्यशाळेस अविनाश तांदळे, एस. डी. सरवदे, आनंद डोंगरे, श्रीगंगाधरे, प्रदीप कांबळे, अमोल तळेकर, संजय जाधवर, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख तसेच जिल्हाभरातील सुमारे शिक्षकांची उपस्थिती होती.
-------------------
शिक्षकांचा घेतला वर्ग
कार्यशाळेत सचिव नंदकुमार यांनी काही शिक्षकांचा वर्ग घेतला. गणितातील गुणाकार, भागाकाराच्या संकल्पना शिक्षकांना विचारल्या. या वेळी बहुतांश शिक्षकांनी योग्य उत्तर दिले. तर काही शिक्षकांचे उत्तर चुकले. चुकलेल्या शिक्षकांना सचिव नंदकुमार यांनी गणितातील बारकावे नेमक्या कशा पद्धतीने शिकवावे याच्या ‘टिप्स’ दिल्या.
-----------
नाक मोजा....अंदाज बांधा
शिक्षण सचिव नंदकुमार यांनी अनेक चुटकुले व मजेदार किस्से सांगून आपल्या दोन तासांच्या भाषणात शेवटपर्यंत चैतन्य कायम ठेवले. त्यांनी तर्क आणि अंदाज याचा संबोध स्पष्ट करण्यासाठी प्रत्येकाला बोटाने आपल्या नाकाची लांबी मोजायला लावली. नंतर तो अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहण्यासाठी अनेकांना स्केलपट्टीने आपल्या नाकाचे तंतोतंत माप घ्यायला लावले. अंदाज आणि वास्तवता यातील फरकाची टक्केवारी विचारून त्यांनी सर्वांना अंतर्मुख केले. आणि हेच अंदाज व तर्क विद्यार्थ्यांना सहज गुणाकार व भागाकारापर्यंत घेऊन जातात पण आम्ही विद्यार्थ्यांना संधीच देत नाही असेही त्यांनी सांगितले. एकंदर यावेळी उपस्थित सहा हजारांच्या आसपास शिक्षकांनी आपल्या नाकाच्या लांबीचा अंदाज बांधला हे मात्र तितकेच खरे.

 

Web Title: Make the kids intrested in maths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.