फळ बागांच्या नुकसानीचे पंचनामी करा; जालन्यात ‘स्वाभिमानी’चा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 03:10 PM2020-09-15T15:10:00+5:302020-09-15T15:16:56+5:30
या रास्तारोको आंदोलनामुळे जालना- बीड महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
वडीगोद्री (जि. जालना) : अतिवृष्टीमुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळ पिकांचे पंचनामे करून शेकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.१५ ) सकाळी सुखापुरी फाट्यावर (ता.अंबड) रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनामुळेजालना- बीड महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डाळिंब, मोसंबी, द्राक्षे, ऊस यासह इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून खरिपातील काही पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, फळपिकांचे पंचनामे अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. मोसंबीवर रोगराई पडल्याने, फळगळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांवर करपा पडल्याने प्रत्येक शेतकऱ्यांना पाच ते सहा लाख रूपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फळपिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी जालना- बीड महामार्गावरील सुखापुरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. मंडळाधिकारी दिवाकर जोगलादेवीकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश बोर्डे, राधाकिसन मैंद, वडीकाळ्याचे सरपंच रामभाऊ काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.