कुपोषित मुलांचे प्रकरण; धोका निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:44 AM2018-04-06T00:44:58+5:302018-04-06T00:44:58+5:30
स्व. शंकरलाल मुंदडा गतिमंद मुलांच्या वसतिगृहात कुपोषणाने २००८ मध्ये किसन या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संस्थेचे सचिव विरेंद्र धोका यांच्यासह वसतिगृहाचे अधीक्षक आणि मुख्य कार्यकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील स्व. शंकरलाल मुंदडा गतिमंद मुलांच्या वसतिगृहात कुपोषणाने २००८ मध्ये किसन या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संस्थेचे सचिव विरेंद्र धोका यांच्यासह वसतिगृहाचे अधीक्षक आणि मुख्य कार्यकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
जालना शहरातील स्व. शंकरलाल मुंदडा गतीमंद मुलांच्या वसतिगृहात १६ आॅक्टोबर २००८ रोजी किसन या मुलाचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. त्याला सोलापूर येथील सोजर अनाथ आश्रमातून १३ आॅगस्ट २००८ रोजी जालना येथील स्व. शंकरलाल मुंदडा गतिमंद मुलांच्या वसतिगृहात आणण्यात आले होते. किसनची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला प्रथम खाजगी आणि नंतर जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, किसनचा मृत्यू कुपोषणाने झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी जाहीर केले. याप्रकरणी महिला व बालविकास विभागाचे तत्कालीन अधिकारी रामकृष्ण ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात संस्थेचे सचिव वीरेंद्र धोका यांच्यासह अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांविरूद्ध भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकारी ठाकरे यांनी तपास पूर्ण करून संबंधितांविरूद्ध आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणावर जिल्हा प्रथम सत्र न्यायाधीश श्रीमती एस. डी. सोनी यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. सुनावणीत वसतिगृहाचा केअर टेकर रावसाहेब राऊत, स्वच्छता कर्मचारी राजपाल लाहोट, अधिक्षिका विजया लाळे, प्रशिक्षक आशा बिल्ला यांची साक्ष नोंदविण्यात आली. यात किसनच्या कुपोषणास नेमके कोण जबाबदार आहे हे निष्पन्न होऊ शकले नाही. तसेच महिला बालविकास प्रकल्पाचे अधिकारी रामकृष्ण कुलकर्णी यांची साक्ष घेण्यात आली. यात २००८ मध्ये या वसतिगृहात ३० ते ३५ गतीमंद मुले होती. १३ आॅगस्ट २००८ रोजी सोलापूरच्या सोजर वसतिगृहातून किसनसह ४ मुले स्व. शंकरलाल मुंदडा गतिमंद मुलांच्या वसतिगृहात आणण्यात आली. १५ आॅक्टोबर २००८ रोजी किसनचा कुपोषणाने मृत्यू झाला. या घटनेनंतर चौकशी अधिकारी देशमुख आणि वरिष्ठ लिपिक गिते यांनी किसनच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी केली.
उलट तपासणीत महिला व बालविकास प्रकल्पाचे अधिकारी रामकृष्ण कुलकर्णी म्हणाले की, किसन हा तेव्हा दोन दिवसांपासून आजारी होता. तो कुपोषणाने ग्रस्त असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले होते. पण जेव्हा स्व. शंकरलाल मुंदडा गतीमंद मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली. तेव्हा मुलांची योग्यरितीने देखभाल ठेवली जात असल्याचे व त्यांचे आरोग्यही सुस्थितीत असल्याचे आढळून आले. तसेच चांगल्या दर्जाचे अन्नही या वसतिगृहातील मुलांना देण्यात येत असल्याचे पाहणीत आढळून आल्याचे कुलकर्णी यांनी दिलेल्या साक्षीत सांगितले.