जालन्यातील कुपोषण रिहॅबिलिटेशन सेंटरचा राज्यात टॉप टेनमध्ये समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:16 AM2019-07-01T01:16:59+5:302019-07-01T01:18:26+5:30
जालन्यातील कुपोषण निर्मूलनासाठी येथील शासकीय रुग्णालयात २०१५ मध्ये सुरू केलेले एनआरसी सेंटर अर्थात न्यूट्रीशियन रिहॅबिलिटेशन सेंटरने राज्यात अव्वल भरारी घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यातील कुपोषण निर्मूलनासाठी येथील शासकीय रुग्णालयात २०१५ मध्ये सुरू केलेले एनआरसी सेंटर अर्थात न्यूट्रीशियन रिहॅबिलिटेशन सेंटरने राज्यात अव्वल भरारी घेतली आहे. राज्यातील पहिल्या दहा केंद्रांमध्ये जालन्यातील या केंद्राचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर आणि त्या केंद्रातील आहारतज्ज्ञ तसे परि चारिकांचे परिश्रम यामुळेच हे शक्य झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.
जालना जिल्हा हा शिक्षणा सोबतच आरोग्याबाबतही दुर्लक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे कुपोषणाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. ज्या कुपोषित बालकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या तर त्यांचे पुढचे जगणे सुकर होईल असे अति कुपोषित मुला-मुलींचा शोध अंगणवाडी ताईकडून घेतला जातो.ज्यांचे वजन हे अत्यंत कमी असेल आणि त्यांच्या दंडाचा घेर हा ११.५ सेमी. पेक्षा कमी असेल, अशांना लगेचच जालन्यातील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले जाते. येथे अशा मुलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष येथे २१०५ मध्ये सुरू झाला आहे. आता पर्यंत या चार वर्षात साधारपणे अतिकुपोषित जवळपास ५०० पेक्षा अधिक मुलांवर येथे यशस्वी उपचार करून त्यांना ठणठणीत करण्यात आल्याची माहिती या केंद्राचे बालरोगतज्ज्ञ सुरजित अंभुरे आणि डॉ. भारती आंधळे यांनी दिली.
जालन्यातील या केंद्रात जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील कुपोषित बालकांवर उपचार केले जातात. या केंद्रात बालाकांसोबतच त्यांच्या आईला पोषण आहार देण्यात येतो. साधारणपणे किमान १५ दिवस या मुलांना त्यांच्या आईसह आरोग्यदायी आणि विविध जीवनसत्व असलेल्या आहाराचा पुरवठा करून मुलांचे वजन वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. विशेष म्हणजे आईला शंभर रूपये रोज या प्रमाणे भत्ताही दिला जातो. कुपोषणाचे प्रमाण नेमके कशामुळे वाढते, या बद्दल डॉ. अंभुरे यांना विचारले असता, ज्यावेळी एखादी महिला ही गर्भवती असेल तर तिला दर्जेदार आहार मिळत नाही. तसेच घरातील गरिबी आणि रोजगाराच्या शोधात मुलांकडे होणारे दुर्लक्ष ही कारणे आहेत. तर काही मुलांमध्ये हा आजार अनुवंशिक असतो. तर काहींना अन्य आजारांमुळे वजन न वाढण्याची कारण असल्याचे डॉ. अंभुरे म्हणाले. देश आणि राज्य पातळीवर कुपोषण निर्मूलनासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे.
त्यांचाच एक भाग म्हणून जालन्यात हे केंद्र सुरू केले आहे. अशा प्रकारची केंदे्र ही राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्याचा मोठा लाभ कुपोषित बालकांसाठी होत असल्याचा दावा डॉ. अंभुरे यांनी केला. या केंद्रात पी.जे भालतिलक, लता पोफळे, एस.व्ही. ढिल्पे, पूजा अग्रवाल, पुष्पा नरोडे या डॉक्टरांना मोठी मदत करतात.