बोगस सेंद्रीय खत प्रकरणात व्यवस्थापकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:16 AM2019-05-09T00:16:39+5:302019-05-09T00:17:45+5:30
येथे कृषी विभागाने आठवडाभरापूर्वी गुंडेवाडी शिवारातील राजलक्ष्मी फर्टीलायझर कंपनीच्या गोदामावर छापा मारुन बनावट सेंद्रीय खत जप्त केले होते. त्या प्रकरणात कंपनीचा व्यवस्थापक गणेश रामराव इंगळे याला चंदनझिरा पोलिसांनी नांदेड येथून मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.
जालना : येथे कृषी विभागाने आठवडाभरापूर्वी गुंडेवाडी शिवारातील राजलक्ष्मी फर्टीलायझर कंपनीच्या गोदामावर छापा मारुन बनावट सेंद्रीय खत जप्त केले होते. त्या प्रकरणात कंपनीचा व्यवस्थापक गणेश रामराव इंगळे याला चंदनझिरा पोलिसांनी नांदेड येथून मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. बुधवारी त्याला जालना न्यायालयात हजर केले असता, ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याने त्याला पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
जालन्यापासून जवळच असलेल्या गुंडेवाडी येथील राजलक्ष्मी फर्टीलायझरच्या गोदामावर ३ मे रोजी कृषी विभागाने छापा मारुन तब्बल ६३ लाख रुपयांचा बनावट खताचा साठा जप्त केला होता. या खतामध्ये लिंबोळी तसेच पिकांच्या वाढीसाठी पोषक पदार्थ असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात या खतांच्या नमुन्याची तपासणी केली असता, ते सर्व बनावट आढळून आले होते. तसेच दुसऱ्या दिवशी कृषी विभागाने चंदनझिरा परिसरातील औद्योगीक वसाहत परिसरातील वरद फर्टीलायझर या बनावर सेंद्रीय खत तयार करणाºया कारखान्यावर छापा मारुन तब्बल ९० लाख रुपये किमतीचे साडेचारशे मेट्रीक टन बनावट सेंद्रीय खत जप्त केले. दोन्ही कारवाई मिळून तब्बल दीड कोटीचा बनावट खताचा साठा जप्त केला. दोन्ही बनावट कारखाने कोणाचे हे कृषी विभागाला माहित असतांना त्यांनी जाणिवपूर्वक सुरुवातीला कारखान्याच्या मालकाच्या नावाने फिर्याद देण्याचे टाळले होते. मात्र तक्रार दाखल होऊनही पोलिसाकडून तपासाला गती मिळत नसल्याने माध्यमातून यावर ताशेर ओढण्यात आले होते. यामुळे नागरिकात सुध्दा रोष वाढला होतो. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यांची गांभिर्याने दखल घेत चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांना या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्याने या तपासाला गती आली. कोठाळे यांनी तातडीने दोन पथकाव्दारे तपास सुरु केला. सहायक पोलीस निरीक्षक आर. एस.सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी अनिल काळे, कृष्णा भंडागे, स्वाती शेरणागत यांनी तातडीन नांदेड जाऊन कंपनीचा व्यवस्थापक गणेश इंगळे यास मोठ्या शिताफिने अटक केली. तर वरद फर्टीलायझरच्या मालक आणि व्यवस्थापक अद्यापही फरार आहे. त्यांना पकडण्यासाठी पथकाची नेमणूक केली आहे. लवकरच इतर आरोपींना सुध्दा अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिली.
आमदाराचा खोडा
राजलक्ष्मी फर्टीलायझर कंपनीच्या मालकाविरुध्द गुन्हा दाखल झाल्याने चंदनझिरा पोलिसांचे एक पथक मंगळवारी आरोपीला पकडण्यासाठी नांदेड येथे गेले होते. सदन वस्तीमध्ये अचानक पोलिसांचे पथक दाखल झाल्याने सर्वजण आवक झाले होते.
संबधीत कंपनीच्या व्यवस्थापकास पकडू नये, म्हणून नांदेड येथील विद्यमान आमदाराने चंदनझिरा पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना न जुमानता आरोपीच्या मुसक्या आवळल्या.