पत्नीला नांदायला पाठवण्यास नकार, जावयाचा पाठलाग करत सासऱ्यावर कोयत्याने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 01:31 PM2022-05-21T13:31:12+5:302022-05-21T13:31:49+5:30
पती-पत्नीट नेहमीच किरकोळ वाद होत असल्यामुळे पत्नी माहेरी आली होती.
आष्टी (जि. जालना) : पत्नीला नांदायला पाठवत नाही म्हणून जावयानेच सासऱ्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आष्टी येथील पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यात सासरा मुक्तीराम आबाजी इंगोले (रा. गोळेगाव, ता. परतूर, जि. जालना) हे गंभीर जखमी आहेत.
मुक्तीराम इंगोले यांच्या मुलीचा विवाह गेवराई तालुक्यातील काठवडा येथील नागोराव पवार याच्यासोबत झालेला आहे. त्यांच्यात नेहमीच किरकोळ वाद होत असल्यामुळे इंगोले यांची मुलगी माहेरी आली होती. वादामुळे ते मुलीला पाठवत नव्हते. शुक्रवारी आष्टी येथील आठवडी बाजार होता. त्यामुळे मुक्तीराम इंगोले हे बाजारात आले होते. जावाई नागाेराव पवार हा त्यांचा पाठलाग करीत होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आष्टी पोलीस ठाण्यासमोर आल्यावर जावई पवार याने पाठीमागून इंगोले यांच्या डोक्यात व पाठीवर कोयत्याने वार केले. त्याच वेळी आष्टी पोलीस ठाण्याचे सपोउपनि बी. एस. जाधव घटनास्थळी पोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मुक्तीराम इंगोले यांची प्रकृती चिंताजनक असून, पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथे हलविण्यात आल्याची माहिती सपोनि. शिवाजी नागवे यांनी दिली. या प्रकरणी आयोध्या नागोराव पवार यांच्या तक्रारीवरून संशयित नागोराव पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. शिवाजी नागवे हे करीत आहेत.