MPSCपासचा बोभाटा; सत्कारही स्वीकारले, लग्नाला स्थळ आले अन् झाला भांडाफोड, गुन्हा दाखल
By दिपक ढोले | Published: August 5, 2022 05:42 PM2022-08-05T17:42:25+5:302022-08-05T17:44:44+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेऊन त्याला नोटीस बजावली होती.
जालना : एमपीएससीने प्रसिध्द केलेल्या यादीमध्ये खाडाखोड करून खोटे पत्र तयार करून विक्रीकर उपायुक्त झाल्याचा गावभर बोभाटा करणे तरुणाच्या अंगलट आले आहे. या तरुणावर आज सेवा कर भवनाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर पंढरीनाथ लोखंडे (रा. कोदोली ता. भोकरदन) असे संशयिताचे नाव आहे.
कोदोली येथील तरुण रामेश्वर लोखंडे हा भोकरदन येथे एका दुकानात आधार कार्ड लिंक व विविध अर्ज ऑनलाइन भरण्याचे काम करतो. घरची परिस्थिती हलाक्याची असल्याने चांगली नोकरी मिळवून अधिकारी होण्याची त्याची इच्छा होती. मात्र, अनेकवेळा परीक्षा देऊन यश मिळाले नाही. त्यामुळे त्याने काही मित्रांच्या मदतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे खोटे पत्र तयार केले. त्यानंतर एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन विक्रीकर उपआयुक्त झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली.
कोदोली येथील ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. सत्कार करण्यासाठी अनेकांनी घरासमोर गर्दी केली होती. त्याला लग्नासाठी स्थळही आले होते. परंतु, त्याच्या बोगस विक्रीकर उपायुक्ताचा भांडाफोड झाला. अन् महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेऊन त्याला नोटीस बजावली होती. शुक्रवारी जालना येथील सेवा कर भवनातील राज्यकर निरीक्षक गणेश संगम यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात संशयित रामेश्वर लोखंडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी केली फसवणूक
राज्यकर आयुक्तालयाच्या वतीने राज्य उपायुक्तांची यादी प्रसिध्द करण्यात आली होती. या यादीमध्ये सुजित रमाकांत शिंदे यांचे नाव व नियुक्तीचे ठिकाण खोडून त्या ठिकाणी रामेश्वर लोखंडे असे नाव टाकले होते. त्यात राज्यकर उपआयुक्त ऐवजी राज्यकर उप आयुक्त मुंबई असे ठिकाणी टाकून अधिकारी झाल्याचा बोभाटा केला होता.
अहमदनगर जिल्ह्यातही प्रकार उघडकीस
अहमदनगर जिल्ह्यातील तरुणीनेही उपजिल्हाधिकारी झाल्याचे खोटे पत्र तयार करून सत्कार सोहळे करून घेतले. वैष्णवी अर्जुन गिरी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने अशाच प्रकारे खोटी कागदपत्रे तयार करत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या तरुणीने उपजिल्हाधिकारी झाल्याचे सांगत एमपीएससीच्या सही आणि शिक्क्याचे खोटे पत्र तयार केले. या पत्रात तिची निवड स्पोर्ट कोट्यातून झाल्याचा उल्लेखही आहे. या दोन्ही फसवणुकीच्या घटना फेब्रुवारीमध्ये उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोघांवरही कारवाई केली जाईल असे जाहीर केले होते.