पंसमध्ये पैसे उधळणारे, सदावर्तेंच्या वाहनावर हल्ला करणारे साबळे निवडणूक आखाड्यात
By विजय मुंडे | Updated: April 22, 2024 19:34 IST2024-04-22T19:31:12+5:302024-04-22T19:34:04+5:30
४० आर जमीन अन् एका कारचे मालक, नऊ लाख रुपयांचे कर्जही डोक्यावर

पंसमध्ये पैसे उधळणारे, सदावर्तेंच्या वाहनावर हल्ला करणारे साबळे निवडणूक आखाड्यात
जालना : अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात पैसे उधळणे, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ला करणे असो किंवा मराठा आरक्षण आंदोलनात स्वत:ची कार पेटवून देणे असो यामुळे सर्वपरिचित झालेले गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथील सरपंच मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
विविध प्रकारची आंदोलने केल्याने मंगेश साबळे हे सर्वपरिचित आहेत. विशेषत: अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत फुलंब्री पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात पैसे उधळणे असो किंवा मराठा आरक्षण आंदोलनाच्या कालावधीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाची केलेली तोडफोड असो या कारणांमुळेही साबळे चांगलेच प्रसिद्ध झाले होते.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साबळे यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी गावा-गावात बैठकाही घेतल्या होत्या. बैठकांमध्ये मतदारांचा विशेषत: युवकांचा त्यांना प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी तीर्थक्षेत्र राजूर येथून रॅली काढत जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला. बीएससी शिक्षण झालेल्या साबळे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात ४० हजारांची रोकड, एक कार, ४० आर जमीन व एक घर असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या अवलंबित व्यक्तीकडेही ८० आर जमीन आहे. शिवाय त्यांच्यावर ९ लाख ३० हजारांचे कर्ज असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, साबळे यांच्या एन्ट्रीने निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.
सहा गुन्हे दाखल
मंगेश साबळे यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांत सहा गुन्हे दाखल आहेत. प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, एकाही प्रकरणात दोषसिद्धता झालेली नसल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे, अपक्ष उमेदवार साबळे यांनी आजही तीन अर्ज भरले आहेत.